भारतातील अदानी ग्रूपचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांना खूप मोठा धक्का बसला आहे. कारण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील दुसरं स्थान त्यांना गमावावं लागलं आहे. ते आता तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. शेअर बाजाात अदानी ग्रूपच्या शेअर्सनं सपाटून मार खाल्ल्यानं अदानी यांना खूप मोठं नुकसान झालं आहे. अवघ्या तीन दिवसांत गौतम अदानी यांच्या मालमत्तेत जवळपास ९.४ अब्ज डॉलर म्हणजेच ७० हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.
ब्लमबर्ग बिलिनिअर इंडेक्सच्या माहितीनुसार, गौतम अदानी यांची एकूण मालमत्तेत बुधवाऱी जवळपास ४ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. गौतम अदानी यांच्या नुकसानीनंतर चीनचे उद्योगपती झोंग शशान पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. दरम्यान त्यांच्या उत्पन्नातही गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. सध्या आशियातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स उद्योगसमूहाचे मुकेश अंबानी अव्वल स्थानी कायम आहेत.
अदानी ग्रूपचे शेअर्स का पडले?शेअर बाजारात सोमवारी अदानी ग्रूपच्या शेअर्रमध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. आजही अदानींच्या पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोनचे शेअर्स गडगडले आहेत. याशिवाय अदानी ट्रान्समिशन, अदानी पावर आणि अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्येही घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं (एनएसडीएल) तीन विदेशी फंडींग अकाऊंटवर स्थगिती आणली आहे. याच फंडांनी अदानी ग्रूपमधील कंपन्यांमध्ये ४३ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सची सोमवारी पडझड पाहायला मिळाली. बहुतेक शेअर्सला लोअर सर्किट लावावं लागलं. सलग तीन दिवसांपासून अदानीच्या शेअर्सला गळती लागली आहे.