Join us

संपत्ती गमावण्यात गौतम अदानी नंबर-1; हिंडनबर्ग रिपोर्टमुळे 60 अब्ज डॉलर्स स्वाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 9:17 PM

Bloomberg Billionaires Index: जानेवारीत श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर गेलेले गौतम अदानी सध्या 21व्या स्थानावर घसरले आहेत.

Gautam Adani Networth: जानेवारी 2023 मध्ये अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी टेस्ला प्रमुख इलॉम मस्क यांना मागे टाकून जगातील दुसरे सर्वात श्रीमंत बनतील, अशी शक्यता होती. तेव्हा दोघांमधील अंतर फक्त 16 अब्ज डॉलर होते. तेव्हा गौतम अदानी यांची संपत्ती 121 अब्ज डॉलर होती, तर मस्क यांची संपत्ती 137 अब्ज डॉलर होती. पण, याच महिन्यात अदानी समूहावर एक बॉम्ब पडला.

24 जानेवारी 2023 रोजी हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्ट समोर आली. या रिपोर्टद्वारे अदानी समूहावर हेराफेरी करुन शेअर्स लुटल्याचा आरोप करण्यात आला. ही रिपोर्ट समोर आल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स पत्त्याच्या घरासारखे कोसळले. यानंतर पुढच्या एकाच महिन्यात अदानी समूहाचे शेअर्स 85 टक्क्यांपर्यंत घसरले. 

शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम गौतम अदानी यांच्या नेटवर्थवर झाला. 27 जानेवारी रोजी एकाच दिवसात गौतम अदानी यांच्या संपत्तीत $20.8 बिलियनची घट झाली. कोणत्याही अब्जाधीशांसाठी एका दिवसातील हा सर्वात मोठा तोटा होता. अदानी समूहाचे बाजारमूल्य $150 अब्जांनी घसरले. त्यामुळे गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 40 अब्ज डॉलरवर आली. ऑक्टोबर 2022 मध्ये एकेकाळी त्यांची एकूण संपत्ती $143 अब्ज झाली होती.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांची संपत्ती आता $60.3 अब्ज आहे. 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांत त्यांच्या संपत्तीत $60.2 बिलियनची घट झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते 21 व्या स्थानावर आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स वधारल्यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत $20 अब्जाची वाढ झाली आहे. परंतु काही समूह कंपन्यांचे शेअर्स अजूनही त्यांच्या उच्चांकापेक्षा खूपच खाली व्यवहार करत आहेत. 

टॅग्स :गौतम अदानीअदानीव्यवसायशेअर बाजारशेअर बाजार