Gautam Adani : आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्याकडे पैशांची कमतरता नाही, पण तरीदेखील त्यांच्यावर हजारो कोटी रुपयांचे कर्ज आहे. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण गेल्या वर्षभरात अदानींवरील कर्जात मोठी वाढ झाली आहे. अदानी समूहाने परदेशी बँकांकडून घेतलेली कर्जे कमी झाली आहेत, पण देशातील स्थानिक बँकांकडून घेतलेल्या कर्जात सुमारे 18 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्थानिक बँका आणि NBFC चे अदानी समूहावरील कर्ज एकूण कर्जाच्या 36 टक्क्यांवर पोहोचले आहे. तर गेल्या वर्षी हा आकडा केवळ 31 टक्के होता. याचा अर्थ स्थानिक बँका आणि NBFC कडून घेतलेल्या कर्जात 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गौतम अदानी यांचे एकूण कर्ज किती वाढले, हे आकडेवारीवरुन समजून घेण्याचा प्रयत्न करू.
स्थानिक बँकांकडून घेतलेली कर्जे वाढली31 मार्च 2024 पर्यंत गौतम अदानी यांनी भारतीय बँकांकडून एकूण 88,100 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे, जे समूहाच्या एकूण 2,41,394 कोटी रुपयांच्या कर्जाच्या 36 टक्के आहे. तर 31 मार्च 2023 पर्यंत समूहाकडे देशांतर्गत बँका आणि NBFC चे 70,213 कोटी रुपयांचे कर्ज होते, जे समूहाच्या एकूण 2,27,248 कोटी रुपयांच्या कर्जाच्या 31 टक्के होते.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँक इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक या बँकांचे अदानी समूहावर कर्ज आहे. मात्र, बँकांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. तज्ज्ञांच्या मते, विमानतळ आणि ग्रीन एनर्जी व्यवसायातील भांडवली खर्चामुळे समूहाचे कर्ज वाढले आहे. याशिवाय, अदानी समूहाने मूलभूत पायाभूत सुविधा, बंदरे, धातू, बांधकाम साहित्य इत्यादी व्यवसायांमध्ये बरीच गुंतवणूक केली आहे.
जागतिक बँकांकडून घेतलेले कर्ज कमी झालेअदानी समूहाने परदेशी बँकांकडून घेतलेले कर्ज मार्च 2024 पर्यंत 63,296 कोटी रुपये झाले आहे, जे एका वर्षापूर्वी 63,781 कोटी रुपये होते. याचा अर्थ जागतिक बँकांच्या कर्जात थोडीशी घट झाली आहे. दुसरीकडे, ग्लोबल कॅपिटल मार्केटचे कर्जदेखील एका वर्षात 72,794 कोटी रुपयांवरून 69,019 कोटी रुपयांवर घसरले आहे.
ऑपरेशनल नफ्यात 45 टक्के वाढमार्च अखेरीस अदानी समूहाचे कर्ज दरवर्षी सुमारे 6 टक्क्यांनी वाढले असेल, परंतु 2023-24 या आर्थिक वर्षात ऑपरेशनल नफा 45 टक्क्यांनी वाढून 82,917 कोटी रुपये झाला आहे. आता समूह चालू आर्थिक वर्षात 1,00,000 कोटी रुपयांच्या ऑपरेशनल नफ्याकडे लक्ष देत आहे.