Gautam Adani News : अदानी समूहाची नजर आता दुसऱ्या क्षेत्रावर आहे. अदानी समूहाच्या कंपनीने थायलंडची कंपनी इंडोरामा रिसोर्सेससोबत (Indorama Resources) जॉईंट व्हेन्चर सुरू केलं आहे. ही माहिती सोमवारी एक्स्चेंजला देण्यात आली. अदानी एंटरप्रायझेसची उपकंपनी अदानी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड आणि इंडोरामा रिसोर्सेस यांनी संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे. ज्यात दोघांचाही समान हिस्सा आहे. नवीन युनिट रिफायनरी, पेट्रोकेमिकल्स आणि केमिकल व्यवसाय पाहणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09
अदानी एंटरप्रायझेसनं शेअर बाजारांना दिलेल्या माहितीनुसार इंडोरामा रिसोर्सेससोबत स्थापन झालेल्या या नवीन युनिटचं नाव व्हॅलर पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (Valor Petrochemicals Ltd) असेल. कंपनीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. इंडोरामा व्हेंचर्स पब्लिक कंपनी लिमिटेड ही जगातील सर्वात मोठी पेट्रोकेमिकल कंपनी आहे.
काय करणार ही कंपनी?
अदानी एंटरप्रायजेसनं दिलेल्या माहितीनुसार, हा संयुक्त उपक्रम रिफायनरी, पेट्रोकेमिकल आणि केमिकल व्यवसाय हाताळणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, नवीन युनिट महाराष्ट्रात ३.२ दशलक्ष टन क्षमतेचा प्युरिफाईड थेरेपॅथलिक अॅसिड प्लांट उभारण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या तीन अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची योजना आहे. येत्या काळात हा संयुक्त उपक्रम मुंद्रा येथेदेखील काम करू शकतो.
अदानी एंटरप्रायझेसचा मोठा व्यवसाय
सध्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड ही अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी आहे. विमानतळ, डेटा सेंटर, संरक्षण आणि एअरोस्पेस, सोलर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये या ग्रुपचं कामकाज सुरू आहे. गेल्याच आठवड्यात अदानी एंटरप्रायझेसने विल्मर इंटरनॅशनलसोबत २५ वर्षे जुना संयुक्त उपक्रम असलेल्या अदानी विल्मर लिमिटेडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अदानी पेट्रोकेमिकल ही अदानी एंटरप्रायझेसची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.