नवी दिल्ली-
अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गचा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर 'अदानी ग्रूप'च्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये त्सुनामीच आली आहे. गौतम अदानींचं साम्राज्याला या अहवालामुळे जबर धक्का बसला आहे. दररोज अदानींच्या संपत्तीत मोठी घट होताना दिसत आहे. ताज्या आकडेवारीनुसार गौतम अदानी आता जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत टॉप-२० मधूनही बाहेर फेकले गेले आहेत.
Bloomberg Billionaires Index च्या माहितीनुसार गौतम अदानींच्या नेटवर्थमध्ये झालेल्या पडझडीमुळे ते आता श्रीमंतांच्या यादीत थेट २१ व्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांची एकूण संपत्ती आता ६१.३ अब्ज डॉलर इतकी झाली आहे आणि गेल्या २४ तासात त्यांना १०.७ अब्ज डॉलरचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेअर्समधील घट पाहता गौतम अदानी आता फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गपेक्षाही मागे गेले आहेत. झुकरबर्गची एकूण संपत्ती ६९.८ अब्ज डॉलर इतकी आहे आणि तो श्रीमंतांच्या यादीत १२ व्या स्थानावर आहे.
गौतम अदानी गुरुवारी ६४.७ अब्ज डॉलरसह जगातील श्रीमंतांच्या यादीत १६ व्या स्थानावर होते. अवघ्या २४ तासांत ते थेट पाच स्थानांनी खाली घसरुन २१ व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. २०२२ या वर्षात सर्वाधिक कमाई करणारे म्हणून ओळख मिळवलेल्या गौतम अदानींसाठी २०२३ हे वर्ष मात्र निराशाजनक ठरताना दिसत आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार या वर्षाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत अदानींची एकूण ५९.२ अब्ज डॉलरची संपत्ती राख झाली आहे. गेल्या दहाच दिवसात अदानींना ५२ अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे.
गेल्या आठवड्याभरात अदानींच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे शेअर बाजारात लिस्टेट असलेल्या अदानींच्या कंपन्यांचा एकूण मार्केट कॅप १०० अब्ज डॉलरपेक्षाही कमी झालं आहे. गुरुवारी शेअर बाजाराचा व्यवहार बंद होतना अदानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या शेअरमध्ये २१.६१ टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली असून शेअर १,६९४.१० रुपये इतका झाला आहे. अदानी पावरच्या शेअरमध्ये ४.९८ टक्के, तर अदानी विल्मर लिमिटेडच्या शेअर्समध्ये ५ टक्के घट नोंदवण्यात आली. यासोबतच अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांनी घसरण झाली असून शेअर किंमत १,०३९ रुपये इतकी झाली आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची घट झाली आहे.