अदानी समूहाचे (Adani Group) अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत अलिकडच्या वर्षांत रॉकेट वेगाने वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी (Prime Minister Narendra Modi) असलेल्या त्यांच्या निकटतेमुळे त्यांना व्यवसायात मोठा फायदा झाल्याचा टीकाकारांचा आरोप आहे. मात्र अदानी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या या यशामागे अनेक नेते आणि सरकारे असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला यश कोणत्याही एका नेत्यामुळे मिळालेले नाही, पण याचे श्रेय गेल्या तीन दशकांत झालेल्या धोरणात्मक बदलांना जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ते एकाच राज्यातून आले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर निराधार आरोप करणे सोपे जाते, असेही अदानी म्हणाले.
इंडिया टुडे समुहाला दिलेल्या मुलाखतीत अदानी यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्या टीकाकारांबद्दल तुमचे म्हणणे काय आहे, जे तुमचे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आहे असे म्हणतात, असा सवाल त्यांना करण्यात आला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी एकाच राज्यातून आलो, त्यामुळे माझ्यावर असे निराधार आरोप करणे सोपे जाते. मात्र यात तथ्य नाही. राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना माझा प्रवास सुरू झाला. त्यांनी एक्झिम पॉलिसीला चालना दिली आणि त्यातूनच माझे एक्स्पोर्ट हाऊस सुरू झाले. ते नसते तर मी सुरुवात केली नसती,” असे अदानी या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
केव्हा मिळाली संधी?“१९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणा लागू केल्या तेव्हा त्यांना दुसरी संधी मिळाली. इतर अनेकांसोबत त्यांनाही याचा फायदा झाला. तिसरी संधी १९९५ मध्ये आली, जेव्हा केशुभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्याआधी गुजरातमधील औद्योगिक विकास फक्त मुंबई ते दिल्ली NH-8 पर्यंत मर्यादित होता. त्यांनी किनारी भागावर लक्ष केंद्रित केले आणि मला माझे पहिले बंदर मुंद्रा येथे बांधण्याची संधी मिळाली,” असे त्यांनी नमूद केले.
२००१ मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना चौथी संधी मिळाली. त्यांच्या धोरणांनी गुजरातच्या आर्थिक विकासाला पंख दिले. आज मोदी देशात तेच करत आहेत. माझ्या विरोधात अशा गोष्टी बोलल्या जातात हे दुर्दैव आहे. हे सर्व निराधार आणि आपल्या प्रगतीच्या विरुद्ध पक्षपाती आहे. मोदींनी देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात बदल घडवून आणला आहे. देशाच्या आर्थिक विकासाबरोबरच सामाजिक विकासावरही ते भर देत असल्याचे अदानी म्हणाले.
लाखो लोकांना रोजगारमोदींच्या धोरणांमुळे देशातील औद्योगिक आणि आर्थिक विकास झाला असल्याचे अदानी म्हणाले. आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडियाने उत्पादन आणि व्यवसायासाठी नवीन संधी निर्माण केल्या आहेत आणि लाखो लोकांना रोजगार दिला आहे. स्वच्छ भारत, जन धन योजना, डीबीटी आणि आयुष्मान भारत यांसारख्या योजनांनी देशात आमूलाग्र बदल घडवून आणले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आपल्याला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यासाठी ५८ वर्षे लागली. पुढच्या १२ वर्षांत आपण दोन ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचलो आणि त्यानंतर पाच वर्षांत आपण तीन ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचलो. पुढील दशकात, आपण दर १२ ते १८ महिन्यांमध्ये GDP मध्ये एक ट्रिलियन डॉलर्स जोडण्याच्या स्थितीत असू,” असे अदानी यांनी नमूद केले.
तरुणांचा देश“२०५० मध्ये भारत हा १६० कोटी तरुणांचा देश असेल, ज्यांचे सरासरी वय ३८ वर्षे असेल. भारतामध्ये जगातील सर्वात मोठा मध्यमवर्ग असेल आणि आपली अर्थव्यवस्था ३० ट्रिलियन डॉलर्सची असेल. हे शतक खऱ्या अर्थाने भारताचे असेल,” असे गौतम अदानी यांनी नमूद केले. असे मानले जात आहे की पुढील वर्षी मंदी जगात दार ठोठावू शकते. याबाबत अदानी म्हणाले की, “२००८ मध्येही काही लोकांनी असे भाकीत केले होते पण भारताने ते चुकीचे सिद्ध केले. यावेळीही तेच होणार आहे. १ फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प अशा चिंता दूर करण्यासाठी मदतीचा ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.