Join us

गौतम अदानींकडून सरकारचं कौतुक; म्हणाले, "दूरदर्शी धोरणांमुळे आपण विकासात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 10:10 AM

बदलाचा पाया हा सरकारी धोरणांपासून सुरू होतो, असंही अदानी यावेळी म्हणाले.

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी बुधवारी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या बालपणाच्या आठवणीपासून हिंडेनबर्गपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं. कार्यक्रमादरम्यान बोलताना गौतम अदानी यांनी मोदी सरकारचं कौतुकही केलं. 

"बदलाचा पाया हा सरकारी धोरणांपासून सुरू होतो. अशा परिस्थितीत मी विश्वासानं सांगू शकतो की जगातील कोणतंही सरकार कोणत्याही देशाला अशाप्रकारे बदलण्यास सक्षम नाही. आपल्या सरकारनं गेल्या १० वर्षांमध्ये अनेक दूरदर्शी धोरणांमुळे आपण जागतिक विकासात एका उंचीवर पोहोचलो आहोत. आपण जागतिक आर्थिक विस्तारात १६ टक्क्यांची प्रभावी योगदान देत आहोत. हा एक विक्रम आहे. हे विक्रम सातत्यानं तोडत राहू असा विश्वास आहे," असं गौतम अदानी यावेळी म्हणाले.  

भारतीय बँकिंग प्रणालीचा फायदा घेऊन आणि क्रेडिट रेटिंग सुधारून, इतर कंपन्या संघर्ष करत असताना अदानी समूहानं पायाभूत सुविधा प्रकल्प यशस्वीपणे राबवले असल्याचेही ते म्हणाले. 

मुंबई एक अनोखं ठिकाण 

यावेळी बोलताना त्यांनी आपल्या मुंबईच्या आठवणीही जाग्या केल्या. "मुंबईत ४ वर्ष हिऱ्यांच्या व्यापारात काम केलं. मुंबई एक अनोखं ठिकाण आहे. मुंबईनं मला मोठा विचार करणं आणि स्वप्न पाहायला शिकवलं. जेव्हा मी १९ वर्षांचा होतो आणि मुंबईत स्थायिक होण्याच्या विचारात होतो तेव्हा माझ्या आयुष्यात एक वेगळं वळण आलं. माझ्या मोठ्या भावानं एक छोटी पीव्हीसी फिल्म फॅक्ट्री सुरू करण्यासाठी मदत म्हणून मला अहमदाबादला बोलावून घेतलं. तेव्हा आयातीवर असलेल्या निर्बंधांमुळे कच्च्या मालाची कमतरता जाणवत होती. हा काळ व्यवसायासाठी आव्हानात्मक होता. या आव्हानांमुळेच शिकता आलं," असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :गौतम अदानीनरेंद्र मोदीअदानी