Join us

गौतम अदानींचं जोरदार 'कमबॅक', हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर १०० अब्ज डॉलर्स क्लबमध्ये पुन्हा एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 11:52 AM

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात आलेल्या हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहाला मोठा झटका बसला होता. समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स आपटले होते.

Gautam Adani comeback: गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात आलेल्या हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहाला मोठा झटका बसला होता. समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स आपटले होते. त्यामुळे अदानी समूहाला मोठं नुकसान सोसावं लागलं होतं. परंतु आता अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी जोरदार पुनरागमन केलं आहे. ते पुन्हा एकदा 100 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. 2023 मध्ये, यूएस-आधारित शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टनंतर त्यांची संपत्ती 130 अब्ज डॉलर्सवरून 50 अब्ज डॉलर्सवर आली. 

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, बुधवारी अदानींची एकूण संपत्ती 100.7 अब्ज डॉलर्स इतकी वाढली, ज्यामुळे ते जगातील 12 व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. अदानी या वर्षातील टॉप गेनर्सच्या यादीत आहेत आणि आतापर्यंत त्यांची एकूण संपत्तीतील 16.4 अब्ज डॉलर्स परत आले आहेत. 

हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये अदानी समूहावर शेअर्समध्ये फेरफार आणि फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. यानंतर अदानी यांच्या संपत्तीत 80 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घट झाली होती, परंतु त्यानंतर ती आता पुन्हा वाढली आहे. केवळ 2023 मध्ये, अदानी समूहाला मार्केट कॅपमध्ये 150 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झालं होतं. अदानी यांनी गुंतवणूकदार आणि कर्जदारांना आकर्षित करण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि नियामकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं होतं. 

गुंतवणूकदारांचा मिळवला भरवसा 

जीक्युजी पार्टनर्सनं अदानी समूहामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. राजीव जैन यांच्या GQG Partners LLC नं गेल्या वर्षी अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये सुमारे 4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली, तर कतार इनव्हेस्टमेंट अथॉरिटीनं सुमारे 500 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आणि टोटल एनर्जीसनं अदानी ग्रीन एनर्जीसह संयुक्त उपक्रमात 300 मिलियन डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक केली.

टॅग्स :गौतम अदानीअदानीशेअर बाजार