Join us  

Gautam Adani: "माझा २२ राज्यांमध्ये बिझनेस, पण भाजप काही...", गौतम अदानींनी अखेर मौन सोडलं अन् स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 9:28 PM

उद्योगपती गौतम अदानी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून झुकतं माप दिलं जात असल्याच्या आरोपावर अखेर आपलं मौन सोडलं.

नवी दिल्ली-

उद्योगपती गौतम अदानी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून झुकतं माप दिलं जात असल्याच्या आरोपावर अखेर आपलं मौन सोडलं. "काँग्रेसच्या राजीव गांधी सरकारच्या काळात आमचा व्यवसाय वाढू लागला होता आणि आज तो २२ राज्यांमध्ये पसरला आहे, त्या सर्व राज्यांमध्ये काही भाजपाची सत्ता नाही", असं अदानी म्हणाले. इंडिया टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अदानी यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर उत्तर दिलं. 

अदानी म्हणाले की, माझ्या यशाचे रहस्य कठोर परिश्रम आहे. व्यवसाय आणि व्यावहारिक जीवनात एकच सूत्र काम करतं. ते म्हणजे मेहनत आणि फक्त मेहनत. कौटुंबिक पाठबळ आणि देवाची कृपाही तुम्हाला खूप मदत करते. भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये केलेल्या कामाची माहिती देताना अदानींनी प्रत्येक राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचा मानस असल्याचं म्हटलं.

"कोणत्याही राज्य सरकारशी मला कोणतीही अडचण नाही. केरळमध्ये, ममता दीदींच्या पश्चिम बंगालमध्ये, नवीन पटनायकजींच्या ओडिशामध्ये, जगनमोहन रेड्डींच्या राज्यात आणि अगदी केसीआरच्या राज्यातही आम्ही काम करत आहोत. फक्त भाजपाशासित राज्यांमध्येच आमचा व्यवसाय आहे असं नाही", असं गौतम अदानी म्हणाले. 

राहुल गांधींनीही केलं कौतुक: गौतम अदानीगौतम अदानी म्हणाले की, गुंतवणूक करणं हे आमचं काम आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निमंत्रणावरून आम्ही राजस्थानच्या इन्व्हेस्टर समिटलाही गेलो होतो. यानंतर राहुल गांधीजींनीही राजस्थानमधील आमच्या गुंतवणुकीचे कौतुक केलं होतं. राहुल गांधी यांची धोरणे विकासाच्या विरोधात नाहीत हे मला माहीत आहे. काँग्रेसशासित राज्यात ६९,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीकडे त्यांनी लक्ष वेधलं.

गुजरातमधील आपल्या व्यवसायाच्या वाढीबद्दलही अदानींनी आपलं मत व्यक्त केलं. "गुजरात सरकार उद्योगाला प्रोत्साहन देणारं सरकार आहे. त्यांनी आमच्यासाठी काही विशेष केलं असं नाही. पंतप्रधान मोदींसोबतच्या संबंधांवर टीका करणारे हे सोयीनं विसरतात की माझा प्रवास जवळपास चार दशकांपूर्वीच सुरू झाला आहे", असं अदानी म्हणाले.

टॅग्स :गौतम अदानीनरेंद्र मोदी