Gautam Adani: उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील संकटे संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी, हिंडेनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टनंतर अदानींना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी बाजार नियामक सेबीकडून तपास सुरू आहे, ज्याची व्याप्ती आता वाढवण्यात आली आहे. अदानी समूहाचा व्यवसाय ज्या देशांत पसरला आहे, त्या देशांच्या बाजार नियामकांकडून सेबी माहिती गोळा करत आहे.
एवढंच नाही तर सेबीने अदानी समूहाशी संबंधित जास्तीत जास्त माहिती गोळा करण्यासाठी शोध पत्रकारांची संघटना असलेल्या, ओसीसीआरपीशीही संपर्क साधला आहे. या संस्थेने अदानी समूहाबाबत अनेक रिपोर्ट प्रसिद्ध केले असून त्यात अनेक कागदपत्रांचा हवाला देण्यात आला आहे. सर्व प्रकारची कागदपत्रे एकाच ठिकाणी गोळा करण्याचा सेबीचा प्रयत्न आहे, जेणेकरून प्रकरणाशी संबंधित जास्तीत जास्त माहिती गोळा करता येईल. OCCRP ने सध्या कोणत्याही प्रकारची कागदपत्रे देण्यास नकार दिला आहे.
मुंबई विमानतळांच्या खात्यांचीही चौकशी सुरू
अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने माहिती दिली की, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने मुंबई विमानतळाशी संबंधित प्रकरणांमध्ये खात्यांची तपासणी सुरू केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संबंधित खात्यांची चौकशी करण्यासाठी मंत्रालयाकडून 14 ऑक्टोबरलाच नोटीस प्राप्त झाली होती. मंत्रालयाने कंपनीकडून 2017 ते 2022 या कालावधीतील खात्यांची माहिती मागवली आहे.
शेअर मालकीची चौकशी केली जात आहे
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बाजार नियामक सेबी अदानी समूहाच्या अनेक सूचीबद्ध कंपन्यांसोबत गल्फ एशिया फंडाच्या संबंधांची चौकशी करत आहे. हा निधी ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये स्थापन करण्यात आला आहे. अदानी समूहाने शेअर मालकी नियमांचे उल्लंघन केले आहे की, नाही हे देखील सेबी पाहत आहे. गल्फ एशिया फंडच्या वेबसाइटवर सांगण्यात आले की, हा फंड दुबईतील व्यापारी नासिर अली शबान अली यांचा आहे. मात्र, ही वेबसाइट आता काम करत नाही. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या फंडाने अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.