Gautam Adani : भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये व्यवसाय करणाऱ्या दिग्गज उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी आता 'ड्रॅगन' किल्ल्यामध्ये पाय रोवले आहेत. अदानी यांनी चीनमधील शांघाय शहरात आपली कंपनी सुरू केली आहे. चीनमध्ये कंपनी सुरू करणे, ही अदानी समूहासाठी एक धोरणात्मक वाटचाल आहे. याचा फायदा अदानी ग्रुपच्या इतर कंपन्यांना होणार आहे. ही कंपनी चीनमध्ये अदानी समूहासाठी नवीन बाजारपेठ उघडण्यास मदत करेल.
कंपनीचे नाव काय ?
अदानी ग्रुपने सप्लाय चेन सॉल्यूशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी चीनमध्ये एक कंपनी स्थापन केली आहे. अदानी एंटरप्रायझेसने (AEL) सांगितले की, त्यांच्या सिंगापूरस्थित उपकंपनीने 2 सप्टेंबर 2024 रोजी चीनमधील शांघाय येथे अदानी एनर्जी रिसोर्सेस (शांघाय) कंपनी (AERCL) या नावाने एका कंपनीची स्थापना केली आहे.
AEL खाणकाम, रस्ता, विमानतळ, डेटा सेंटर आणि वॉटर इन्फ्रा व्यवसायात गुंतलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, AERCL ची स्थापना आणि नोंदणी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना कंपनी कायद्यानुसार 2 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आली आहे. कंपनीने अद्याप त्यांचे व्यावसायिक कामकाज सुरू केलेले नाही.
अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स
शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 1.25 टक्क्यांची घसरण दिसून आली. कंपनीचा शेअर 38 रुपयांच्या घसरणीसह 2976.85 रुपयांवर बंद झाला. 3 जून रोजी कंपनीने 3,743 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. शुक्रवारी कंपनीच्या मार्केट कॅपला 18,692.79 कोटी रुपयांचे नुकसान झाले. यामुळे कंपनीचे मूल्यांकन 3,39,361.23 कोटी रुपयांवर आले आहे.