भारत आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) आता जहाज बांधणीच्या व्यवसायात उतरण्याच्या विचारात आहेत. गुजरातमधील मुंद्रा येथील अदानी समूहाच्या फ्लॅगशिप बंदरावर जहाज बांधणीचं काम सुरू होऊ शकतं. कारण चीन, जपान आणि दक्षिण कोरियातील बहुतांश यार्ड किमान २०२८ पर्यंत पूर्णपणे बुक झाले आहेत. त्यामुळेच जगात जहाजे चालविणाऱ्या बड्या कंपन्या जहाजबांधणीसाठी पर्यायी जागा शोधत आहेत. यामध्ये भारताचाही समावेश आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी अदानी समूह जहाजबांधणीत उतरण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. अदानी समूह हा देशातील सर्वात मोठा पोर्ट ऑपरेटर आहे.
टॉप १० मध्ये येईल भारत
सध्या भारत हा जगातील विसाव्या क्रमांकाचा जहाजबांधणी करणारा देश आहे. जगातील व्यावसायिक जहाजबांधणी बाजारपेठेत भारताचा वाटा केवळ ०.०५ टक्के आहे. तर सरकारनं आपल्या 'मेरिटाइम इंडिया व्हिजन २०३०'मध्ये भारताला या बाबतीत टॉप-१० मध्ये आणण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्याचबरोबर 'डेव्हलप्ड इंडिया २०४७'च्या 'मेरिटाइम अमृत काल व्हिजन'मध्ये हे लक्ष्य टॉप-५ ठेवण्यात आलं आहे. अशा तऱ्हेने गौतम अदानी यांचं हे पाऊल सरकारचं हे उद्दिष्ट साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
जहाज बांधण्याची अदानीची योजना
गौतम अदानी यांची जहाजबांधणीची योजना पाहिली तर ते आधीपासून त्यावर काम करत होते. पण मुंद्रा बंदराच्या ४५ हजार कोटींच्या विस्तार योजनेमुळे ते रखडलं होतं. ईटीने दिलेल्या वृत्तानुसार, मुंद्रा बंदराच्या विस्तारीकरणासाठी पर्यावरणीय आणि इतर नियमांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे. अशा तऱ्हेने ते आता या योजनेवर पुढे जाऊ शकताच. मात्र, यावर अदानी समूहाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
जगाला ५० हजार जहाजांची गरज
कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आता संपूर्ण जग ग्रीन शिपकडे वाटचाल करत असताना अदानी समूहाचा जहाजबांधणी व्यवसाय सुरू करण्याची बातमी समोर आली आहे. यामुळे जगभरातील ताफा बदलून संपूर्ण जगातील जहाजांची जागा घेण्यासाठी येत्या ३० वर्षांत सुमारे ५० हजार जहाजांचा पुरवठा करावा लागणार आहे.