नवी दिल्ली-
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले 'अदानी' समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती गौतम अदानी लवकरच एक नवी कंपनी सुरू करणार आहेत. जर सर्व नियोजित रणनितीनुसार घडलं तर येणाऱ्या काही दिवसांत मुकेश अंबानींच्या जिओ (Mukesh Ambani Reliance Jio) आणि सुनील भारती मित्तल यांच्या एअरटेलला (Sunil Bharti Mittal Airtel) कडवं आव्हान निर्माण होणार आहे.
अदानींचा टेलिकॉम स्पेक्ट्रममध्ये रस
पीटीआयच्या वृत्तानुसार उद्योगपती गौतम अदानींच्या अदानी समूहाने टेलिकॉम स्पेक्ट्रममध्ये रस दाखवला असून तेही स्पर्धेत उतरण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार कंपनीनं यासाठीचं प्लानिंग सुरू केलं आहे. सरकारनं 5G स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी नव्या कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत. यासाठी अंतिम मुदत ८ जुलैपर्यंत होती. सरकारला यासाठी एकूण ४ अर्ज प्राप्त झाले आहेत.
स्पेक्ट्रम लिलावासाठी आले ४ अर्ज
5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची माहिती असणाऱ्या सुत्रांच्या मतानुसार टेलिकॉम सेक्टरमधील तीन खासगी कंपन्या जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियानं २६ जुलै रोजी होणाऱ्या लिलावासाठी अर्ज दाखल केला आहे. तर अर्ज दाखल करणारी चौथी कंपनी अदानी यांची आहे. अदानींच्या याच नव्या कंपनीनं नॅशनल लॉन्ग डिस्टेंस (NLD) आणि आंतरराष्ट्रीय लॉन्ग डिस्टेंस (ILD) लायसन्स प्राप्त केलं आहे. दरम्यान, अदानी समूहाकडून याबाबत कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.
5G स्पेक्ट्रमचा लिलाव
सरकारनं 5G स्पेक्ट्रमचा लिलाव नियोजित केलेल्या वेळेनुसार म्हणजेच १२ जुलै रोजी अर्ज दाखल केलेल्या कंपन्यांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सरकारनं एकूण 72,097.85 MHx स्पेक्ट्रमची लिलाव करण्याची तयारी केली आहे. याची किंमत जवळपास ४.३ लाख कोटी रुपये इतकी असणार आहे.
अंबानी-अदानींचा होणार सामना?
मुकेश अंबानी आणि गौतम अदानी दोघंही आशियातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत समावेश असलेले भारतीय उद्योगपती आहेत. आतापर्यंत दोन्ही उद्योगपतींनी वेगवेगळ्या व्यवसायात आपला दबदबा निर्माण केला आहे. दोघांमध्ये आजवर कधीच व्यवसायिक पातळीवर थेट समोरासमोर स्पर्धा झालेली नाही. मुकेश अंबानींचा रिलायन्स समूह तेल, रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्सपासून टेलिकॉम आणि रिटेल सेक्टरमध्ये काम करतो. तर अदानी समूह बंदर, कोळसा, ग्रीन एनर्जी, वीज वितरण आणि हवाई सेक्टरमध्ये काम करत आला आहे. पण नुकतच अदानी समूहानं पेट्रोकेमिकल्स उद्योगात एन्ट्री घेतली आहे, तर रिलायन्स समूहानं ग्रीन एनर्जी क्षेत्रात प्रवेश केला आहे. आता टेलिकॉम सेक्टरमध्येही अदानी समूह अंबानींना टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती समोर आली आहे.