भारत आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा आपल्या समूहाचा झपाट्यानं विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. केवळ भारतच नाही तर परदेशातही ते आक्रमकपणे आपला व्यवसाय वाढवत आहेत. अदानी समूहाची होल्डिंग कंपनी अदानी एंटरप्रायजेसनं आपल्या विस्तार योजनेचा एक भाग म्हणून आफ्रिकन देश केनियामध्ये विमानतळ खरेदी आणि चालविण्याची योजना आखल्याची माहिती समोर आलीये. त्यासाठी त्यांनी केनियात एक कंपनी स्थापन केलीये. एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर असं या कंपनीचं नाव आहे. केनियाची राजधानी नैरोबी येथील जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं व्यवस्थापन कंपनीला आपल्या हाती घ्यायचंय.
एका मीडिया रिपोर्टनुसार, केनियातील वाहतूक कर्मचारी याला विरोध करत आहेत. यामुळे आपली नोकरी जाण्याची भीती त्यांना वाटत असल्याचं म्हटलं जातंय. शेअर बाजाराला दिलेल्या निवेदनानुसार अदानी एंटरप्रायझेसनं अबुधाबीस्थित आपली उपकंपनी ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेटरच्या माध्यमातून विमानतळांच्या पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. कंपनीनं २०२९ पर्यंत नवीन टर्मिनल आणि टॅक्सीवे प्रणालीसाठी केनिया सरकारला ७५० मिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. २०३५ पर्यंत विमानतळ सुधारण्यासाठी अतिरिक्त ९२ मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची ही योजना आहे. हा करार झाल्यास अदानी समूहाचं हे भारताबाहेरील हे पहिलं विमानतळ ठरेल. सध्या हा समूह देशात अर्धा डझनहून अधिक विमानतळ चालवतो.
लिस्टिंगची योजना
जीएमआर ही भारतातील आणखी एक कंपनी फिलिपिन्समधील मॅक्टन सेबू आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवते. हैदराबादच्या या कंपनीनं ग्रीसमधील क्रीट विमानतळ तसंच इंडोनेशियातील क्वाला नामू आंतरराष्ट्रीय विमानतळ चालविण्यासाठी करार केले आहेत. अदानी एंटरप्रायझेसनं आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत आपली उपकंपनी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सचं लिस्टिंग करण्याची योजना आखली आहे. हा समूह विमानतळ व्यवसाय सांभाळतो. गौतम अदानी १०२ अब्ज डॉलर्स संपत्तीसह भारत आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.