नवी दिल्ली : अदानी समूह मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. गौतम अदानी यांचा समूह ग्रीन एनर्जीपासून डेटा सेंटर्स, विमानतळ आणि आरोग्यसेवा या व्यवसायांमध्ये 150 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहे. कंपनी ही गुंतवणूक 1 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सची व्हॅल्युएशन असलेली कंपनी तयार करण्यासाठी करत आहे.
अदानी समूहाचे सीएफओ जुगेशिंदर रॉबी सिंग यांनी कंपनीच्या संपूर्ण नियोजनाची माहिती दिली आहे. अदानी समूह सध्या डेटा सेंटर, विमानतळ, पेट्रोकेमिकल्स, सिमेंट आणि मीडियामध्ये गुंतवणूक करत आहे, अशी माहिती जुगेशिंदर रॉबी सिंग यांनी वेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेडने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या गुंतवणूकदारांच्या बैठकीत देण्यात आली. अदानी समूह 1988 मध्ये व्यापारी म्हणून सुरू झाला आणि आता बंदरे, विमानतळ, रस्ते, वीज, अक्षय ऊर्जा, वीज पारेषण, गॅस वितरण या क्षेत्रांमध्ये वेगाने वाढ होत आहे.
जुगेशिंदर रॉबी सिंग म्हणाले की, अदानी समूह पुढील 5-10 वर्षांत ग्रीन हायड्रोजन व्यवसायात 50-70 बिलियन डॉलर्स आणि ग्रीन एनर्जीमध्ये 23 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. वीज व्यवसायात 7 बिलियन डॉलर्स, वाहतूक क्षेत्रात 12 बिलियन डॉलर्स आणि वाहतूक क्षेत्रात 5 बिलियन डॉलर्स गुंतवणूक करणार आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने क्लाउड सेवांसह डेटा सेंटर्समध्ये 6.5 बिलियन अमेरिकी डॉलर्स आणि विमानतळांसाठी 9-10 बिलियन डॉलर्स गुंतवण्याची योजना आखली आहे. तसेच, एसीसी आणि अंबुजा सिमेंट सिमेंट क्षेत्रात 10 बिलियन डॉलर्स गुंतवणूक करण्याची तयारी सुरु आहे.
कंपनी 2 बिलियन अमेरिकी डॉलर्स गुंतवणुकीवर 1 मिलियन टन प्रतिवर्ष पीव्हीसी उत्पादन सुविधा स्थापन करण्याच्या योजनेसह पेट्रोकेमिकल व्यवसायात एंट्री करत आहे आणि 1 बिलियन अमेरिकी डॉलर्सच्या गुंतवणुकीवर 0.5 मिलियन टन वार्षिक स्मेल्टरसह तांबे क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. याचबरोबर, वैद्यकीय सेवा क्षेत्रात विमा, हॉस्पिटल्स आणि डायग्नोस्टिक्स आणि फार्मामध्ये 7-10 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे, असे जुगेशिंदर रॉबी सिंग यांनी सांगितले.
दरम्यान, 2015 मध्ये अदानी समूहाचे मार्केट कॅप जवळपास 16 बिलियन अमेरिकी डॉलर्स होते आणि 2022 मध्ये ते 260 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतके झाले आहे. म्हणजेच सात वर्षांत ते 16 पटीने वाढले आहे. दुसरीकडे, 150 बिलियन डॉलर्स गुंतवणुकीसह कंपनीची योजना समूहाला 1 ट्रिलियन डॉलर्सच्या व्हॅल्युएशनवर नेण्याची योजना आखली आहे.