आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश गौतम अदानी यांनी 2022 IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. हुरुन इंडियाच्या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. परंतु तुम्हाला माहितीये गौतम अदानी यांचे ज्येष्ठ बंधू यांचं नावदेखील भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट आहे.
आयआयएफएल वेल्थ आणि हुरुन यांनी बुधवारी जाहीर केलेल्या पहिल्या दहा श्रीमंत भारतीयांच्या यादीत अदानी कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे. गौतम अदानी यांचे ज्येष्ठ बंधू विनोद शांतीलाल अदानी हे आता 1.69 लाख कोटी रूपयांच्या संपत्तीसह सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय ठरले आहेत. विनोद अदानी दुबईचे रहिवासी आहेत. आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार गेल्या एका वर्षात ते आठव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
‘गौतम अदानी आणि कुटुंबाची संपत्ती पाच वर्षांत 15.4 पट वाढवली, तर विनोद शांतीलाल अदानी आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती 9.5 पट वाढली,’ असे अहवालात म्हटले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये गौतम अदानी यांनी आठव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. तर विनोद अदानी हे 2018 साली या यादीत 49 व्या क्रमांकावर होते. परंतु चार वर्षांमध्ये त्यांनी थेट सहाव्या क्रमांकावर झेप घेतली.
किती आहे दोघांची संपत्ती
गौतम अदानी आणि विनोद अदानी या बंधूंची एकूण संपत्ती 12,63,400 कोटी रूपये इतकी आहे. हुरुन इंडिया रिच लिस्टच्या पहिल्या दहा जणांच्या 40 टक्के इतकी आहे. विनोद शांतीलाल अदानी आणि कुटुंब या यादीतील सर्वात श्रीमंत अनिवासी भारतीय आहेत. या यादीत 1,103 भारतीयांपैकी एकूण 94 अनिवासी भारतीय आहेत. ज्यांपैकी प्रत्येकाकडे 1,000 कोटी रूपये किंवा त्याहून अधिक संपत्ती आहे.
अदानी समूहाच्या कंपन्यांच्या मूल्यात झालेली वाढ हे विनोद अदानींच्या संपत्ती झालेल्या प्रचंड वाढीचे रहस्य आहे. विनोदभाई या नावाने ओळखले जाणारे, विनोद अदानी हे दुबईत वास्तव्यास असून ते सिंगापूर आणि जकार्ता येथे ट्रे़डिंग व्यवसाय सांभाळतात.
अदानींनी दिवसाला कमावले 1612 कोटी
आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश गौतम अदानी यांनी 2022 आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. हुरुन इंडियाच्या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. रिपोर्टनुसार, गेल्या एका वर्षात अदानी यांच्या मालमत्तेत 116 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण 5,88,500 कोटी रुपयांची भर पडली आहे. दर दिवसाला अदानी यांनी 1,612 कोटी रुपये कमावले आहेत.