Gautam Adani : दिग्गज उद्योगपती गौतम अदानी सातत्याने आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहेत. आता त्यांनी पुढील 28 महिन्यांत 33 हजार कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. अदानी समूह डिसेंबर 2026 पर्यंत 4 अब्ज यूएस डॉलरच्या पॉलिव्हिनाईल क्लोराईड (PVC) प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करून पेट्रोकेमिकल क्षेत्रात प्रवेश करणार आहेत.
भारतात याची किती मागणी?
पॉलिव्हिनाईल क्लोराईड (PVC) जगभरात उत्पादित तिसरे सर्वात सामान्य सिंथेटिक प्लास्टिक पॉलिमर आहे. रेनकोट, शॉवरचे पडदे, खिडकीच्या चौकटी, इनडोअर प्लंबिंग पाईप्स, वैद्यकीय उपकरणे, वायर आणि केबल इन्सुलेशन, बाटल्या, क्रेडिट कार्ड आणि फ्लोअरिंग यांसारखी उत्पादने तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. भारताची वार्षिक पीव्हीसी मागणी सुमारे 40 लाख टन आहे, परंतु देशांतर्गत उत्पादन क्षमता केवळ 15 लाख टन आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत आहे. याचाच फायदा अदानी समूहाला घ्यायचा आहे.
गुजरातमध्ये प्लांट उभारणार
समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस गुजरातमधील मुंद्रा येथे पेट्रोकेमिकल क्लस्टरची स्थापना करत आहे. या क्लस्टरमध्ये वार्षिक 2 मिलियन टन क्षमतेचा पीव्हीसी प्लांट उभारण्याचा मानस आहे. हा प्लांट अनेक टप्प्यात उभारला जाईल. प्रारंभिक टप्पा डिसेंबर 2026 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या काळात कारखान्याची उत्पादन क्षमता वार्षिक 10 लाख टन असेल.
गेल्यावर्षी प्रकल्प थांबवावा लागला
अदानी ग्रुपने यापूर्वीच या प्रकल्पाचे काम सुरू केले होते, पण आर्थिक अडचणींमुळे गेल्या वर्षी मार्चमध्ये हा प्रकल्प थांबवला. त्यानंतर आता ग्रुपने पुनरागमनाची रणनीती आखली आहे आणि मोठा निधीही जमा केला. याशिवाय, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या नेतृत्वाखाली कर्जदारांचा एक गट या प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करत आहे.