Join us  

अदानींची घसरगुंडी सुरूच, आता टॉप ३० उद्योगपतींच्या यादीतूनही बाहेर, उरली केवळ एवढी संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 4:28 PM

Gautam Adani: हिंडेनबर्गने अदानींबाबत रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यापासून अदानींची घसरण सुरू आहे. अदानी सुरुवातीला पहिल्या १०, नंतर पहिल्या २० आणि आता पहिल्या ३० श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत.

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमुळे अदानी उद्योगसमुहाला जबरदस्त आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अदानी समुहाच्या शेअर्सची उडत असलेली घसरगुंडी कधी थांबेल याबाबत आजही कुणीही खात्रीशीरपणे सांगू शकत नाही. दिवसागणिक गौतम अदानी यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. २४ जानेवारीला अमेरिकन शॉर्टसेलर फर्म हिंडेनबर्गने अदानींबाबत हा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यापासून अदानींची घसरण सुरू आहे. अदानी सुरुवातीला पहिल्या १०, नंतर पहिल्या २० आणि आता पहिल्या ३० श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत.

गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये सातत्याने घट होत असल्याने जगभरातील श्रीमंतांमध्ये असलेला त्यांचा दबदबा वेगाने कमी झाला आहे. गेल्यावर्षी जबरदस्त कमाई करत गौतम अदानी जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती बनले होते. वर्ष अखेरीस ते चौथ्या क्रमांकावर टिकून होते. मात्र २०२३ या वर्षाची सुरुवात अदानींसाठी दु:स्वप्न ठरली आहे. अदानी यावर्षात कमाईचा विक्रम करतील असे वाटत असतानाच हिंडेनबर्गचा रिपोर्ट आला आणि अदानींचे शेअर्स वेगाने कोसळले. त्यामुळे संपत्ती कमावणाऱ्यात नाही तर संपत्ती गमावणाऱ्यांमध्ये अदानी पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

हिंडेनबर्गचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला तेव्हा अदानी हे जगभरातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर होते. त्यांची नेचवर्थ जवळपास ११६ अब्ज डॉलर एवढी होती. मात्र हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यापासून अदानी समुहाचे शेअर्स धडाधड कोसळून निचांकी पातळीवर पोहोचले. ही घसरण अजूनही सुरूच आहे.

अदानी समुहाचे मार्केट कॅप १२ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक घटले आहे. या दरम्यान, शेअर्सचं मूल्य घटल्याने गौतम अदानी यांची नेटवर्थसुद्धा कमी होत गेली आहे. हिंडेनबर्गच्या रिपोटमुळे अदानी समूह पुरता हादरल्याने गौतम अदानी हे टॉप १० अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर फेकले गेले. आता अदानी टॉप ३० श्रीमंत उद्योगपतींच्या यादीतून बाहेर गेले आहेत. आता ते ३०व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.  

टॅग्स :गौतम अदानीव्यवसायपैसा