जगातील 5 व्या आणि आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी यांच्या अदानी समूहानेही आता क्रिकेटच्या मैदानात पाय ठेवला आहे. अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी स्पोर्ट्सलाइनने (Adani Sportsline) UAE च्या प्रीमियर T20 लीगमध्ये फ्रँचायझी घेऊन फ्रँचायझी क्रिकेटमध्ये एन्ट्री केली आहे. महत्वाचे म्हणजे, UAE T20 लीग ही इंडियन प्रीमियर लीग (IPL) प्रमाणेच असेल.
अहमदाबाद आणि लखनौ फ्रँचायझीमध्ये होता रस -अदानी समूहाने ऑक्टोबर 2021 मध्ये 2022 साठीचा इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघ विकत घेण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, 5100 कोटी रुपयांची बोली लावूनही गौतम अदानी यांच्या मालकीचा समूह अहमदाबाद अथवा लखनौ फ्रँचायझीं मिळवू शकला नव्हता.
एकूण 34 सामने खेळले जाणार -UAE ची T20 लीग ही अमिराती क्रिकेट बोर्डाकडून परवाना प्राप्त एक वार्षिक स्पर्धा आहे. या स्पर्धेत एकूण 34 सामने होणार असून सहा संघांचा समावेश असेल. यातील वेगवेगळ्या संघांत जगातील टॉप क्रिकेटर्स असण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, यूएई टी-20 लीगमध्ये, अदानी समूहाशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मुकेश अंबानी, बॉलीवुड मेगास्टार शाहरुख खान आणि जीएमआरचे किरण कुमार ग्रंथी, यांच्यासारखे दिग्गजही संघांचे मालक आहेत.