विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहापैकी एक असलेल्या ‘रेमंड’ची धुरा पुत्र गौतम सिंघानिया यांच्याकडे सोपविल्यानंतर कथित अडचणींना तोंड देत असलेले ज्येष्ठ उद्योगपती विजयपत सिंघानिया यांनी संपूर्ण संपत्ती आणि कंपनी मुलाकडे सोपवून कदाचित चूक झाली असावी, अशी भावना व्यक्त केली आहे. मात्र, त्याचवेळी गंभीर आर्थिक संकटाला तोंड देत असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचे स्पष्ट केले आहे.माध्यमांकडून दिल्या जात असलेल्या बातम्या पूर्णत: निराधार आहेत. माझी आर्थिक परिस्थिती कधीही वाईट नव्हती. ईश्वराच्या कृपेमुळे कधीही वाईट होणार नाही. गौतमने मनात येईल ते केले तरी तो माझे काहीही बिघडवू शकत नाही. शेअरधारकांच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णयही त्यांनी फेटाळून लावले. शेअर धारकांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्याचे कोणतेही कारण नव्हते, असे त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले. माझा संपत्तीवर पूर्ण अधिकार असल्यामुळेच मी उच्च न्यायालयात पुत्राविरुद्ध लढत आहे. मी आणि गौतमने संपत्तीबाबत करार केला होता. आता गौतम त्या करारापासून दूर गेला आहे. ८ फेब्रुवारी २०१५ रोजी मी माझी सर्व कमाई गौतमकडे सोपविली. मात्र त्यानंतर मी जसा विचार केला त्याप्रमाणे गौतम राहिला नव्हता. मी संपूर्ण कंपनी त्याच्याकडे सोपवून कदाचित चूक केली असावी, असे विजयपत सिंघानिया यांनी म्हटले आहे.हा पूर्ण वाद जेके हाऊसबाबत आहे. ही बिल्डिंग १९६० मध्ये बांधली गेली. तेव्हा ती १४ माळ्यांची होती. नंतर या बिल्डिंगचे चार ड्युप्लेक्स रेमंडची शाखा असलेल्या पश्मिना होल्डिंग्सला दिले गेले. त्यांच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, सिंघानिया यांनी कंपनीतील आपले शेअर मुलाला दिले होते. मीडियात येणाºया बातम्यांनुसार, या शेअर्सची किंमत सुमारे १००० कोटी रुपये इतकी होती. परंतु आता गौतम यांनी त्यांना निराधार सोडले असून त्यांच्याकडून गाडी व चालकही परत घेतले आहेत. मलबार हिल येथे त्यांचा स्वत:चा ३६ माळ्यांचा ड्युप्लेक्स जेके हाऊस आहे. परंतु येथे राहण्यासाठी त्यांना कायदेशीर लढाई लढावी लागत आहे.सर्व फाईल्स बेपत्ताविजयपत सिंघानिया यांचे वकील दिनयार मदन सांगतात...,दोन वर्षाआधीपर्यंत रेमंड उद्योग समूहाचे मालक राहिलेल्या वयोवृद्ध उद्योगपतीच्या संपत्तीची कागदपत्रे सांभाळणारे दोन कर्मचारी जितेंद्र अग्रवाल व आर.के. गणेरीवाल अचानक गायब झाले आहेत. ते अनेक महिन्यांपासून फोनवरही उपलब्ध नाहीत. मेसेजचे उत्तरही देत नाहीत. विजयपत सिंघानिया यांच्या बँक, शेअर व अन्य खासगी फाईल्सही या दोघांजवळच आहेत. आता आपला दावा सिद्ध करण्यासाठी त्यांच्याजवळ कुठलेच दस्तऐवज उपलब्ध नाहीत. या खटल्यात गौतम सिंघानिया यांना प्रतिवादी बनविण्यात आलेले नाही. कारण, हा वाद पश्मिना होल्डिंग्स व रेमंड्स लि. या दोन कंपन्यांमधील आहे.२०००मध्ये मुलाकडे सोपवली रेमंडची सूत्रेविजयपत यांचा मुलगा गौतम सिंघानिया याने सन २००० मध्ये रेमंडची सूत्रे हातात घेतली. विजयपत सिंघानिया यांनी २०१५ मध्ये रेमंडमधील आपले १ हजार ४१ कोटीचे ३७.१७ टक्के शेअर्स गौतम सिंघानियाच्या नावे केले. जगभरात प्रसिद्ध असलेल्या रेमंड या वस्त्रोद्योगाचा पाया १९२५ मध्ये रचला गेला. या कंपनीची पहिली रिटेल शोरूम १९५८ मध्ये मुंबईत उघडली गेली. १९८० मध्ये विजयपत यांनी कंपनीची सूत्रे सांभाळली.कंपनीचे हित मोठे : गौतम सिंघानियामुलगा आणि रेमंडचा चेअरमन म्हणून आपली भूमिका वेगवेगळी आहे, असे गौतम सिंघानिया यांनी म्हटले आहे. एका निवेदनात ते म्हणतात, ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या नियमानुसार प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु शेअरधारकांनी तो नामंजूर केला. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही. परंतु मुलगा या नात्याने हा मुद्दा चर्चेतून सोडविण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला.’
गौतम यांच्याकडे संपत्ती सोपवून चूक केली -विजयपत सिंघानिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 4:22 AM