नवी दिल्ली : मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अटक केलेले अवंता ग्रुपचे प्रवर्तक व उद्योगपती गौतम थापर यांना ईडीद्वारे होणाऱ्या चौकशीसाठी १० दिवसांची कोठडी दिली. त्यांनी ५०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा बँक कर्ज घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाला अनेक कंगोरे असून स्वरुप व्यापक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.आपल्याला कर्जे मंजूर व्हावीत म्हणून येस बँकेचा मॅनेजर राणा कपूर यांना लाच दिल्याचा आरोप गौतम थापर यांच्यावर आहे. या मनी लाँड्रिंग प्रकरणात दोन वर्षे चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली होती. न्यायालयाने म्हटले आहे की, गौतम थापर यांनी ज्या पद्धतीने कर्ज घोटाळा केला त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. गौतम थापर व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधातले इत्यंभूत पुरावे व त्यांच्या सर्व बँक खाती, मालमत्ता यांची माहिती हाती लागणे गरजेचे आहे.