सोपान पांढरीपांडे, नागपूर
जीएसटी अंमलात आल्यानंतर भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न तब्बल ३,०२,००० कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी कुठलीही अतिरिक्त गुंतवणूक करावी लागणार नाही.
जीएसटी आल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारचे २६ कर संपुष्टात येणार आहेत. त्यात उत्पादन शुल्क, व्हॅट व एन्ट्री टॅक्स/आॅक्ट्रॉयसारखे स्थानिक करसुद्धा असणार आहेत. याचबरोबर जीएसटीचा दर उत्पादक, ठोक व्यापारी व किरकोळ व्यापारी या सर्वांसाठी देशभर एकच राहणार आहे. सध्या वेगवेगळ्या करांसाठी स्वतंत्र विभागांद्वारे वसुली होते. जीएसटी आल्यावर वसुली एकाच विभागाद्वारे होईल. यामुळे उत्पादन खर्चात किमान दोन टक्क्यांनी घट होऊन उद्योग क्षेत्राची क्षमता व उत्पादन दोन्ही वाढणार आहे.
जीएसटी आल्यानंतर केंद्र व राज्य सरकारचे अप्रत्यक्ष करांपासून मिळणारे उत्पन्न वाढणार आहे. सध्या कर चुकवेगिरीमुळे अनेक व्यवहार नोंदवले जात नाहीत. परंतु जीएसटी आल्यानंतर आधी भरलेल्या कराचा सेट आॅफ/रिफंड मिळविण्यासाठी व्यवहार करप्रणालीत उघड करावाच लागणार आहे. याचबरोबर करांवर कर आकारणी होणार नसल्याने व्यापाऱ्यांनी केलेल्या मूल्य वर्धनावर (नफ्यावर) केवळ जीएसटी आकारला जाईल. त्यामुळे व्यापाऱ्यांना कर भरणा करण्यास प्रोत्साहन मिळेल व कर महसूल वाढेल. या सर्वांमुळे वस्तू/उत्पादनांची मागणी वाढेल व परिणामी औद्योगिक उत्पादन वाढून जीडीपीसुद्धा दोन टक्क्याने आपोआप वाढण्याची शक्यता आहे.
सध्या भारताचा एकूण जीडीपी २.२९ ट्रिलीयन डॉलर आहे. डॉलरला ६६ रुपये विनिमय दराने भारताचा जीडीपी १ कोटी ५१ लाख १४ हजार कोटी रुपये आहे. यात जीएसटीनंतर कुठलीही गुंतवणूक न करता ३,०२,०२८ कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
जीडीपी ३,०२,००० कोटीने वाढणार!
जीएसटी अंमलात आल्यानंतर भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न तब्बल ३,०२,००० कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी कुठलीही अतिरिक्त गुंतवणूक करावी लागणार नाही.
By admin | Published: August 9, 2016 03:33 AM2016-08-09T03:33:12+5:302016-08-09T03:33:12+5:30