GDP Growth Rate Q1: भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मंदावला आहे. आकडेवारीनुसार, जून 2024 च्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर 6.7 टक्क्यांवर आला आहे. हा गेल्या 15 महिन्यांतील सर्वात कमी आहे. ही आकडेवारी समोर आल्यानंतर आता RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अर्थव्यवस्थेच्या मंदीचे कारण सांगितले आहे.
निवडणुकीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणतात की, जून तिमाहीत आर्थिक विकासाच्या गतीवर निवडणुकांचा परिणाम झाला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांमुळे आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा पहिल्या तिमाहीत सरकारी खर्चावर परिणाम झाल्याचे त्यांचे मत आहे. आचारसंहितेमुळे सार्वजनिक खर्चात घट झाली, ज्याचा परिणाम पहिल्या तिमाहीतील आर्थिक आकडेवारीवर झाला.
मुख्य आर्थिक सल्लागार काय म्हणाले?
यापूर्वी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) व्ही अनंत नागेश्वरन यांनीही जीडीपी विकास दरासाठी निवडणुकांना जबाबदार धरले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि सरकारच्या भांडवली खर्चात कपात झाल्यामुळे पहिल्या तिमाहीत आर्थिक विकास दरावर परिणाम झाल्याचे त्यांनीही म्हटले आहे.
आरबीआयने हा अंदाज व्यक्त केला होता
जून तिमाहीतील आर्थिक विकास दराची अधिकृत आकडेवारी चर्चेत आहे, कारण ती आरबीआयच्या अंदाजापेक्षा खूपच कमी आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर 7.1 टक्के राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला होता.
या 2 घटकांचा विकास दरावर परिणाम
शक्तीकांत दास म्हणाले की, पहिल्या तिमाहीत रिझर्व्ह बँकेने 7.1 टक्के विकास दराचा अंदाज व्यक्त केला होता, पण राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या पहिल्या आगाऊ अंदाजात विकास दर 6.7 टक्के राहिला. उपभोग, गुंतवणूक, उत्पादन, सेवा आणि बांधकाम यांसारख्या GDP वाढीला चालना देणाऱ्या मुख्य घटकांचा विकास दर 7 टक्क्यांहून अधिक आहे. केवळ दोनच घटकांमुळे विकास दर कमी झाला आणि ते म्हणजे सरकारी खर्च आणि शेती.
आगामी तिमाहीत आर्थिक विकासाला वेग
ते पुढे म्हणतात, सरकारी खर्चात घट होण्याचे कारण बहुधा पहिल्या तिमाहीत लागू झालेली निवडणूक आचारसंहिता आहे. आम्हाला आशा आहे की, येत्या तिमाहीत सरकारी खर्चात वाढ होईल आणि यामुळे आर्थिक वाढीला आवश्यक पाठिंबा मिळेल. पहिल्या तिमाहीत कृषी विकास दर केवळ 2 टक्के होता. चांगल्या पावसामुळे यातही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. एकूणच, येत्या तिमाहीत आर्थिक विकास दरात सुधारणा अपेक्षित आहे.