Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीडीपीत तिमाहीमध्ये २० टक्क्यांची घट शक्य, केअरचा अंदाज

जीडीपीत तिमाहीमध्ये २० टक्क्यांची घट शक्य, केअरचा अंदाज

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये (जीडीपी) २० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता केअर या पतमापन संस्थेने वर्तविली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 05:31 AM2020-08-21T05:31:00+5:302020-08-21T05:31:18+5:30

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये (जीडीपी) २० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता केअर या पतमापन संस्थेने वर्तविली आहे.

GDP quarterly down 20 per cent, CARE estimates | जीडीपीत तिमाहीमध्ये २० टक्क्यांची घट शक्य, केअरचा अंदाज

जीडीपीत तिमाहीमध्ये २० टक्क्यांची घट शक्य, केअरचा अंदाज

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीस लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता दिसत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये (जीडीपी) २० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता केअर या पतमापन संस्थेने वर्तविली आहे.
बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या या अहवालामध्ये देशातील अनेक भागांमधून लॉकडाऊन उठविण्यात आले असले तरी अद्यापही काही भागामध्ये ते सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. या काळामध्ये देशातील आर्थिक व्यवहार ठप्प होऊन त्याचा परिणाम जीडीपी कमी होण्यात होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर होणारा प्रतिकूल परिणाम किती असेल, याचे मोजमाप केल्यावर या प्रभावाची व्याप्ती दिसून येत असल्याचे केअरने म्हटले आहे. त्यामुळेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये सुमारे २० टक्क्यांची घट होण्याचा अंदाज आहे. देशाच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून येत्या ३१ आॅगस्ट रोजी तिमाहीमधील जीडीपीची आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे. यामधून लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम हा अधिकृत स्वरूपामध्ये जाहीर होईल.
> घट आणखी वाढण्याचा जागतिक बॅँकेचा अंदाज
कोरोना विषाणूमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा चालू आर्थिक वर्षामध्ये संकोच होण्याची शक्यता जागतिक बॅँकेने यापूर्वीच व्यक्त केली आहे. याआधी वर्तविलेल्या अंदाजापेक्षा हा संकोच अधिक होण्याची भीती जागतिक बॅँकेतर्फे आता व्यक्त केली जात आहे. असे असले तरी आगामी वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा रुळावर येण्याची शक्यताही बॅँकेने व्यक्त केली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊननंतर मे महिन्यामध्ये जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्था सन २०२०-२१मध्ये ३.२ टक्क्यांनी घटण्याची शक्यता वर्तविली होती. त्यावेळी लॉकडाऊन मे महिन्याच्या
अखेरीस संपुष्टात येण्याची
अपेक्षा होती. मात्र त्यानंतरही देशामधील लॉकडाऊन सुरूच राहिल्याने अर्थव्यवस्थेमधील घट वाढू शकते. जागतिक बॅँकेच्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षामध्ये भारताची अर्थसंकल्पीय तूट ६.६ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पुढील वर्षा त्यामध्ये थोडी घट होऊन हे प्रमाण ५.५ टक्क्यांवर येऊ शकते. लॉकडाऊनमुळे देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्यामध्ये बाधा निर्माण झाल्याने परिस्थिती बिघडण्याचा धोका व्यक्त केला गेला आहे. व्यापार, दळणवळण, पर्यटन यासारख्या क्षेत्रांवर याचा मोठा प्रभाव पडणार आहे.
>काही क्षेत्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता
लॉकडाऊनचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात पडला असला तरी काही क्षेत्रांमध्ये या कालावधीतही वाढ शक्य असल्याचे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. कृषी, वन्य उत्पादन, मत्स्योत्पादन, संरक्षण व त्याच्याशी संबंधित असलेल्या सेवा यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे केअरने म्हटले आहे. अर्थव्यवस्थेच्या अन्य सर्व क्षेत्रांमध्ये मात्र या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Web Title: GDP quarterly down 20 per cent, CARE estimates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.