Join us  

जीडीपीला यंदाचा मान्सून पावेल

By admin | Published: July 28, 2016 1:28 AM

यंदा मान्सून चांगला असल्यामुळे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढून ८ टक्क्यांच्या वर जाईल, असे प्रतिपादन नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी केले.

नवी दिल्ली : यंदा मान्सून चांगला असल्यामुळे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढून ८ टक्क्यांच्या वर जाईल, असे प्रतिपादन नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी केले. राज्यांचे मुख्य सचिव व नियोजन सचिवांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पनगढिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, २0१५-१६ या आर्थिक वर्षातील जीडीपीच्या वाढीचा दर ७.६ टक्के होता. चांगल्या मान्सूनमुळे यंदा त्यात सुमारे १ टक्क्याची वाढ होईल. चांगल्या पावसामुळे कृषी क्षेत्राकडून चांगली अपेक्षा आहे. कृषी क्षेत्राने वृद्धीचे काही अंक जोडले, तर जीडीपीच्या वाढीचा दर ८ टक्क्यांच्या वर जाणे कठीण नाही. २0१६-१७ मध्ये आम्ही ८ टक्क्यांचा टप्पा पार करायलाच हवा. मार्चच्या तिमाहीत भारताच्या जीडीपीचा वृद्धीदर ७.९ टक्के झाला. वस्तू उत्पादन क्षेत्रातील वाढीचा दर मोठा असल्याने २0१५-१६ मध्ये वृद्धीदर ७.६ टक्क्यांवर गेला. हा पाच वर्षांतील उच्चांक होता. गेल्या वर्षी दुष्काळी स्थितीमुळे कृषी क्षेत्राची पीछेहाट झाली होती. २0१५-१६ या वर्षात कृषी वृद्धीदर १.२ टक्के होता. रेल्वे अर्थसंकल्प बंद करण्याबाबत, तसेच आर्थिक वर्षात बदल करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी आयोगाचे सदस्य विवेक देबराय यांनी २0१८ पर्यंत रेल्वे अर्थसंकल्प बंद करण्यात येईल, वित्त वर्षातही बदल होईल, असे वक्तव्य केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)लवकरच बैठकगुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नीति आयोगाची बैठक होणार आहे. या बैठकीत १५ वर्षीय ‘दृष्टिकोन दस्तावेजा’चा आराखडा तयार करण्यात येणार आहे. देशाच्या चौफेर विकासासाठी हा दस्तावेज तयार करण्यात येत आहे.