Join us

जिओची ४जी गती स्पर्धकांपेक्षा कमीच

By admin | Published: November 05, 2016 4:07 AM

रिलायन्स जिओच्या ४जी सेवेची गती अन्य तीन स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत आॅक्टोबरमध्ये कमालीची खालावली असल्याची माहिती समोर आली

नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या ४जी सेवेची गती अन्य तीन स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत आॅक्टोबरमध्ये कमालीची खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. मोफत सेवेमुळे रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गतीवर परिणाम झाला असावा, असे सीएलएसए या संस्थेने केलेल्या अभ्यासात दिसून आले.सप्टेंबरमध्ये जिओची गती ७.२ एमबीपीएस होती, ती आॅक्टोबरमध्ये ६ एमबीपीएसवर आली. दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी भारती एअरटेलची गती मात्र ११.२ एमबीपीएसवरून वाढून ११.५ एमबीएस झाली. दुसऱ्या क्रमांकाची कंपनी व्होडाफोनची गती मात्र ९.१ एमबीपीएसवरून घसरून ७.३ एमबीपीएस झाली. तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आयडियाची गती ७.६ एमबीपीएसवरून ७.७ एमबीपीएसवर गेली. सीएलएसएने म्हटले, आॅक्टोबरमध्ये भारती एअरटेलच्या ४जी सेवेची गती सुधारली. तसेच कंपनीने आपली ४जी सेवा २२पैकी १९ सर्कलमध्ये विस्तारित केली. रिलायन्सची ४जी गती १७ सर्कलमध्ये घसरल्याचे दिसून आले. रिलायन्सने आपल्या निवेदनात म्हटले, दैनंदिन ‘योग्य वापर धोरणा’त (एफयूपी) गती कमी झाल्याने नेटवर्कच्या अनेक चाचण्या झाल्या आहेत. ४जी एलटीई गती सरासरीपेक्षा कमी असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे. सीएलएसएने म्हटले की, दिल्ली व मुंबईसारख्या सर्कलमध्ये जिओची गती सर्वाधिक कमी झाली आहे. यावरून मोफत सेवेमुळे होणारा जास्त वापर हे त्यामागील प्रमुख कारण असावे, असे दिसते. ४जीची गती न वाढल्यास रिलायन्स जिओकडून मोफत सेवा डिसेंबरनंतरही सुरू ठेवण्यात येऊ शकते. त्यामुळे स्पर्धक कंपन्यांवर दरकपातीचा दबाव येईल. चालू वित्त वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत एअरटेलचा वापर ३0 टक्क्यांनी, आयडियाचा २५ टक्क्यांनी घटू शकतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)>ट्रायच्या चाचण्यांतून निघाला निष्कर्ष३जीच्या तुलनेत ४जीची गती तिपटीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ग्राहक ४जीकडे वळण्याचे प्रमाण आगामी काळात वाढेल, असा निष्कर्ष सीएलएसएने काढला आहे. ट्रायने २.५ दशलक्ष ४जी वापरकर्ते आणि ५ लाख ३जी वापरकर्ते यांच्या नेटवर्कवर चाचण्या घेतल्या आहेत. त्यातून हाती आलेल्या माहितीचे विश्लेषण सीएलएसएने केले आहे.