जर्मन रिटेलर Metro एजी भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत आहे. खरं तर, Metro AG भारतीय उपकंपनी मेट्रो कॅश अँड कॅरी इंडिया (Metro Cash & Carry India) मधील आपला हिस्सा विकण्यासाठी भागीदार शोधत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने एका सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रो एजी आपल्या भारतातील व्यवसायाची समीक्षा केल्यानंतर आता रणनितीक भागीदाराच्या शोधात आहे. याबाबत काही बँकर्सशी संपर्कही झाला आहे. भारतात मेट्रो कॅश अँड कॅरी इंडियाचे ३० पेक्षा अधिक स्टोअर्स आहेत.
अंबानी दमानी टाटांशी संपर्कइकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, मेट्रो एजीने मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेल, राधाकिशन दमानी यांच्या एव्हेन्यू सुपरमार्ट्स (डी-मार्ट) आणि टाटा समूहाशी भागभांडवल विक्रीसाठी संपर्क साधला आहे. याशिवाय, अॅमेझॉन, थायलंडच्या चारोन पोकफंड (सीपी) समूह, लुलू ग्रुप आणि PE फंड समारा कॅपिटल यांच्याशी सुरुवातीच्या टप्प्यात चर्चा झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय व्यवसायाला आपले नेटवर्क वाढवण्यासाठी आणि अधिक स्टोअर्स जोडण्यासाठी अधिक गुंतवणूकीची गरज आहे. त्तर दुसरीकडे मेट्रो एजीच्या प्रवक्त्यानेही कंपनी धोरणात्मक पर्यायांचा आढावा घेत असल्याचं सांगितलं आहे.
“मेट्रो इंडिया हा घाऊक विक्रीसाठी प्रचंड क्षमता असलेला वाढता व्यवसाय आहे. मेट्रोची विद्यमान घाऊक क्षमता वाढवण्यासाठी आणि भारतातील व्यवसाय वाढीला गती देण्यासाठी आम्ही संभाव्य भागीदारांसह पर्यायांची समीक्षा करत आहोत,” अशी प्रतिक्रिया मेट्रो एजीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स) गेर्ड कोस्लोव्स्की यांनी दिली.