नवी दिल्ली: आयकर विभागाकडून काही मिनिटात पॅनकार्ड तयार करण्याची नवीन सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे पॅन कार्ड प्राप्त करणं आता अधिक सोपं होणार आहे. आयकर विभागाच्या या नवीन सेवामध्ये आधार कार्डच्या माध्यामातून अर्ज करणाऱ्याची माहिती घेतली जाईल. त्या माहितीमुळे पॅन कार्डच्या माहितीची पडताळणी करणं सोपं जाणार आहे. आयकर विभागाकडून ही नवीन सेवा आठवड्याभरात सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
आयकर विभागाच्या या सेवेमुळे पॅन कार्ड हरवल्यास काही मिनिटांमध्ये डुप्लिकेट पॅनकार्ड मिळू शकणार आहे. याबद्दल एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक पॅन सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. ePAN तयार करण्यासाठी आधार कार्डच्या माहितीवरून व्हेरिफिकेशन करण्यात येईल. व्हेरिफिकेशन करताना तुम्हाला एक OTP आल्यानंतर पडताळणी करवी लागणार आहे.
आधार मध्ये असलेल्या नाव, जन्मदिनांक, वडिलांचे नाव, पत्ता इत्यादी माहिती ऑनलाइन अॅक्सेस केली जाईल. यासाठी PAN card तयार करण्यासाठी ठराविक माहिती वगळता कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसेल. एकदा PAN जनरेट झाल्यानंतर अर्जदाराला एक डिजिटल स्वाक्षरी असलेलं ePAN दिलं जाईल. यामध्ये एक QR कोड असेल. फसवणूकीला आळा घालण्यासाठी क्यूआर कोडमध्ये माहिती इनक्रिप्ट केली जाणार आहे.
नव्या प्रोजेक्टच्या अंतर्गत आठ दिवसांत 62 हजारांहून अधिक ePAN लागू करण्यात आली आहेत. आता देशभरात हा प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार असून सर्व कर भरणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध असणार आहे. आयकर विभागाच्या सेवा डिजिटल करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार असून कुठेही न जाता पॅन कार्ड तयार करून मिळेल.