नवी दिल्ली: पॅन कार्ड आणि आधार कार्डची माहिती कंपनीला न दिल्यास तुमच्या पगारातून २० टक्के रक्कम कापली जाऊ शकते. वार्षिक पगार अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्यांना हा नियम लागू असेल. कर संकलन वाढवण्यासाठी कर विभागानं नवा नियम केला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना कंपनीला पॅन कार्ड आणि आधार कार्डची माहिती द्यावी लागेल. अन्यथा त्यांच्या पगारातून २० टक्के टीडीएस (उद्गमकर) कापला जाईल.
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं (सीबीडीटी) तयार केलेला नवा नियम १६ जानेवारीपासून लागू झाला आहे. वर्षाकाठी अडीच लाख किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना हा नियम लागू होईल. टीडीएसवर लक्ष ठेवण्यासाठी आणि या प्रकारातला उत्पन्न वाढवण्यासाठी नवा नियम तयार करण्यात आला आहे. २०१८-१९ मध्ये सरकारला मिळालेल्या थेट करापैकी ३७ टक्के रक्कम टीडीएसच्या माध्यमातूनच मिळाली होती.
नव्या नियमाबद्दल सीबीडीटीनं ८६ पानांचं परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये प्राप्तिकर कायद्यातल्या कलम २०६-एएचा संदर्भ देण्यात आला आहे. या कलमात कर्मचाऱ्यांना कंपनीला पॅन कार्ड आणि आधार कार्डची माहिती द्यावी लागेल, असा उल्लेख आहे. एखाद्या कर्मचाऱ्यानं पॅन कार्ड आणि आधार कार्डचा तपशील न दिल्यास कंपनी त्याच्या पगारातून कराच्या टप्प्याप्रमाणे लागू होणाऱ्या टक्केवारीनुसार किंवा २० टक्के रक्कम कापू शकते.
...तर कंपनीकडून तुमच्या पगारातील 20 टक्के रक्कम कापली जाणार
नवा नियम १६ जानेवारीपासून लागू; सीबीडीटीकडून परिपत्रक जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 07:56 PM2020-01-24T19:56:23+5:302020-01-24T19:57:50+5:30