मुंबई - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (आरबीआय) वर्ष २०१४ मध्ये परिस्थिती वेगळी हाेती. भारताचे बँकिंग क्षेत्र अनेक अडचणी आणि आव्हानांमुळे त्रस्त हाेते. मात्र, गेल्या दहा वर्षांमध्ये परिस्थितीत प्रचंड बदल झाला असून, हे केवळ ट्रेलर हाेते. अजून बरेच काही करायचे बाकी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले.
आरबीआयच्या ९०व्या स्थापना दिनानिमित्त आयाेजित समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बाेलत हाेते. कार्यक्रमाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पंकज चाैधरी व आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची प्रमुख उपस्थिती हाेती. माेदी म्हणाले की, सरकार आणि आरबीआयने केलेल्या प्रयत्नांमुळे कर्जवाटप १५ टक्क्यांनी वाढले आहे.
मी १०० दिवस व्यस्त, नंतर...मी १०० दिवस निवडणुकीत व्यस्त आहे. तुमच्याकडे बराच वेळ आहे. तुम्ही विचार करून ठेवा. तिसऱ्या कार्यकाळासाठी मी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून धडाधड कामांना सुरुवात हाेणार आहे. अनेक नवे क्षेत्र उदयास येत आहेत. बँकिंग क्षेत्राने अंतराळ आणि पर्यटनासारखे नवे व पारंपरिक क्षेत्रांच्या गरजांसाठीही बँकिंग क्षेत्राने सज्ज राहावे, असेही माेदी म्हणाले. येणाऱ्या काळात अयाेध्या हे जगातील एक माेठी धार्मिक पर्यटन केंद्र बनणार असल्याचेही ते म्हणाले.
महागाई कमी करण्यात आरबीआयला यश आले आहे. बँकिंग क्षेत्रातील सुधारणांमुळे बराच परिणाम झाला आहे. सरकारी बँकांची अनेक कर्जे बुडीत खात्यात गेली हाेती. बँकांचा एनपीए २०१८मध्ये ११.२५% हाेता. ताे सप्टेंबर २०२३पर्यंत घटून ३ टक्क्यांवर आला आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
आरबीआयने याकडे द्यावे लक्ष-आरबीआय २०३५मध्ये १०० वर्षे पूर्ण करणार आहे. येणारे दशक भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच आरबीआयसाठीही आहे. महागाई नियंत्रणाबाबत आरबीआयने चांगले काम केले आहे. - काेराेना महागारी तसेच युद्धांमुळे निर्माण झालेल्या परिस्थिततही महागाई मध्यम पातळीवर आहे. यापुढे आरबीआयने गतीमान विकास, स्थैर्याला सर्वाेच्च प्राथमिकता द्यायला हवी, असे माेदी म्हणाले.
सरकारी बँकांना ३.५ लाख काेटींचे भांडवल-सरकारी बँकांची स्थिती चांगली होण्यासाठी ३.५ लाख काेटींचे भांडवल दिले. प्रशासकीय सुधारणा केल्या आहेत.- दिवाळखाेरीसंदर्भात नवी संहिता लागू केली. त्यातून सुमारे ३.२५ लाख काेटी रुपयांची कर्जप्रकरणे मिटविण्यात आली आहेत. असे माेदी म्हणाले. दरम्यान, सायबर फसवणूक कमी करण्यासाठी आरबीआयने डिजिटा ॲप सादर केले आहे.