Join us  

कर्ज मिळणार झटपट, प्रोसेस पटापट; कर्ज प्रक्रियेत येणार क्रांती: लहान कर्जदारांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 10:53 AM

पथदर्शी प्रकल्पामध्ये किसान क्रेडिट कार्ड लोन, डेअरी लोन, पर्सनल लोन यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क , नवी दिल्ली : यूपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेसला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता झटपट कर्ज देण्यासाठी ‘यूएलआय’ अर्थात युनिफाइड लेंडिंग इंटरफेस घेऊन येणार आहे. यामुळे कर्ज मिळण्याची प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. 

कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हा इंटरफेस तयार करण्यात आला आहे. अर्जदाराची कर्ज घेण्याची क्षमता याद्वारे तपासली जाईल. लहान कर्जे घेणाऱ्यांची यामुळे सोय होणार आहे. वर्षभरापासून देशात यूएलआयच्या पथदर्शी प्रकल्पावर काम सुरू आहे. पथदर्शी प्रकल्पामध्ये किसान क्रेडिट कार्ड लोन, डेअरी लोन, पर्सनल लोन यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 

नेमके काय फायदे होणार?

- यामुळे कर्जाच्या प्रक्रियेत लागणारा वेळ कमी होईल. कर्ज घेणाऱ्याला अनेक ठिकाणी फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. कुठेही रांगेत उभे राहावे लागणार नाही.

- कर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शकपणे पार पडेल. संपूर्ण प्रक्रिया सहमतीच्या आधारे काम करणार असल्याने डेटाही सुरक्षित राहण्याची हमी मिळेल.

काय आहे यूएलआय? 

- हा प्लॅटफॉर्म आधार ई-केवायसी, सरकारच्या कर्जांचा तपशील, पॅन कार्ड व्हॅलिडेशन, अकाऊंट ॲग्रिगेटरसह इतर एजन्सीकडून मिळणाऱ्या माहितीची पडताळणी करेल. 

- ही एक फ्रिक्शनलेस पद्धती असेल. यात कोणत्याही प्रकारचे कार्ड स्वाइप न करता अनेक एजन्सीकडून माहिती मिळवून त्या आधारे कर्जाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 

टॅग्स :बँक