कोलकाता : गतिमान ग्राहक वस्तू उत्पादन (एफएमसीजी) क्षेत्रातील बलाढ्य कंपनी आयटीसीने म्हटले आहे की, सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे घाऊक वितरण साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आपल्या एफएमसीजी उत्पादनांना मोठा फटका बसला आहे.
आयटीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पुरी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अलीकडील काळात नोटाबंदीमुळे घाऊक वितरण साखळीत अडथळे निर्माण झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणून आयटीसीची अनेक एफएमसीजी उत्पादने स्टोअर्सपर्यंत पोहोचेनाशी झाली आहेत.
आयटीसीच्या सर्वसाधारण सभेत अनेक भागधारकांनी कंपनीची उत्पादने सुपर स्टोअर्समध्ये दिसणे कठीण झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीच्या उत्तरात पुरी यांनी वरील उत्तर दिले. आयटीसी सिगारेट उत्पादनाप्रमाणेच शाम्पू, साबण, बिस्किटे, सुगंधी द्रव्ये, पाकीटबंद खाद्यपदार्थ आणि अन्य पदार्थांचे उत्पादन करते.
कंपनीचे चेअरमन वाय. सी. देवेश्वर यांच्याप्रमाणेच पुरी यांनीही स्टोअर्स उपलब्धतेच्या मार्गातील अडचणींचा पाढा बैठकीत वाचला. पुरी यांनी सांगितले की, स्टोअर्समध्ये उत्पादनांना जागा मिळण्याच्या मार्गात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. उत्पादनाचे प्रमाण वाढल्यानंतर या अडचणी दूर होतील, अशी आम्हाला आशा वाटते.
आयटीसीचा हॉटेल व्यवसायातही चांगला जम आहे. यासंदर्भात पुरी यांनी सांगितले की, हॉटेल व्यवसाय मोठी झेप घेण्यासाठी सज्ज झालेला आहे. अनेक मालमत्तांचे सध्या बांधकाम सुरू आहे. दरम्यान, आयटीसीने अलीकडेच गुवाहाटी येथे इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग सुविधेचा शुभारंभ केला आहे.
जीएसटीमध्ये सिगारेटवर लावण्यात आलेल्या कराबाबतही पुरी यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, सिगारेटवरील कर ही खरोखर चिंतेची बाब आहे. सिगारेटवर सध्या तब्बल २०२ टक्के कर लावण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणून सिगारेटची तस्करी सुरू झाली आहे. तसेच तंबाखूच्या अन्य प्रकारांकडे ग्राहक वळत आहेत.
घाऊक वितरण साखळी विस्कळीत
गतिमान ग्राहक वस्तू उत्पादन (एफएमसीजी) क्षेत्रातील बलाढ्य कंपनी आयटीसीने म्हटले आहे की, सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे घाऊक वितरण साखळी विस्कळीत झाली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 04:19 AM2017-07-29T04:19:06+5:302017-07-29T04:19:10+5:30