Join us

जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 4:41 PM

एक कोटी रुपयांची नोकरी सोडून स्टार्टअप सुरू केला आणि आज तिच्या कंपनीचा रेव्हेन्यू ४० कोटींहून अधिक आहे. ती एक यशस्वी बिझनेस वूमन बनली आहे.

व्यवसाय सुरू करणं ही काही सोपी गोष्ट नाही, पण तुमच्यात हिंमत आणि जिद्द असेल तर कोणतंही काम सोपं होतं. उत्तर प्रदेशातील एका मुलीने असंच काहीस केलं. तिने तब्बल एक कोटी रुपयांची नोकरी सोडून स्टार्टअप सुरू केला आणि आज तिच्या कंपनीचा रेव्हेन्यू ४० कोटींहून अधिक आहे. ती एक यशस्वी बिझनेस वूमन बनली आहे.

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे राहणाऱ्या आयुषीसाठी स्टार्टअपचा प्रवास सोपा नव्हता. एक कोटी रुपयाची नोकरी सोडल्यानंतर तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. कुटुंबीय आणि ओळखीच्या लोकांनी तिला आधी तिचं लाईफ सिक्योर करण्याचा सल्ला दिला. परंतु तिने आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली आणि स्टार्टअपच्या जगात प्रवेश केला.

आरुषीच्या म्हणण्यानुसार, कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरींग केल्यानंतर, ती आणि अनेक विद्यार्थी नोकरीसाठी मुलाखती देत ​​होते. आरुषीला अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर आल्या होत्या. देशातील एका मोठ्या कंपनीकडून सर्वाधिक पॅकेज असलेली नोकरीची ऑफर ही तब्बल १ कोटी रुपयांची होती, पण तिने ती नाकारली. कारण तिला स्टार्टअप सुरू करायचा होता. 

आरुषीने पाहिलं होतं की, अनेक तरुण आहेत ज्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. येथूनच तिच्या मनात एक कल्पना आली आणि टॅलेंट डीक्रिप्‍ट (Talent Decrypt) या प्लॅटफॉर्मची सुरुवात झाली. कंपनी सुरू झाली होती, पण बरंच काम बाकी होतं. या प्लॅटफॉर्मवर आयटी कंपन्यांना जोडण्याचं सर्वात मोठं आव्हान होतं. आयुषी आणि तिचे को-फाऊंडर यांना कोणत्याही कंपनीचं ज्ञान नव्हतं. 

स्वतः कंपन्यांमध्ये जाऊन आपल्या प्लॅटफॉर्मबद्दल सांगायचं असा त्यांनी विचार केला. पहिल्याच दिवशी त्यांनी ३० कंपन्यांना भेट दिली, मात्र कोणीही त्यांना आत जाऊ दिलं नाही. एक आठवडा असं चालू राहिलं. त्यानंतर ती वडिलांसोबत गेली आणि एका आयटी कंपनीला तिचं सॉफ्टवेअर  दाखवलं. एकामागून एक, कंपन्या जोडल्या गेल्या आणि आज हा स्टार्टअप ४० कोटी रेव्हेन्यू जेनरेट करत आहे.

आरुषी म्हणते की, टॅलेंट डिक्रिप्ट हा असा प्लॅटफॉर्म आहे जो कोणत्याही कंपनीला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून उमेदवाराची निवड करण्यासाठी एक्सेस देतो. तसेच उमेदवाराचा अनुभव आणि इतर क्षमता लक्षात घेऊन ही निवड केली जाऊ शकते. याशिवाय, तरुणांना नोकऱ्या देण्यासाठीही हा प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरला आहे. आरुषी या कंपनीची संस्थापक आणि सीईओ आहे.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीव्यवसाय