नवी दिल्ली - गेल्या चार वर्षांत आपल्या सरकारने नेमका किती रोजगार निर्माण केला, याची आकडेवारी शोधा, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खात्याच्या मंत्र्यांना दिले आहेत.उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, २0१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा आदेश मोदी यांनी दिला आहे. मोदींनी मंत्र्यांना सांगितले की, गेल्या चार वर्षांत आपल्या मंत्रालयाच्या वतीने कोणत्या योजना राबविण्यात आल्या, त्यातून किती रोजगार निर्माण झाले आहेत, याचा हिशेब काढा, तसेच तुमच्या खात्याच्या विविध योजनांचा जीडीपी वृद्धीवर किती परिणाम झाला, याचेही मोजमाप करा.गेल्या निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी १ कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, हे आश्वासन पूर्ण करण्यात मोदी अपयशी झाल्याची टीका होत आहे. रोजगार निर्मितीची आकडेवारी समोर आल्यास सरकारला या टीकेला उत्तर देणे सोपे होईल, असे मोदी यांचे गणित आहे. ही आकडेवारी २0१४च्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी साह्यभूत ठरेल, असे मोदी यांना वाटत आहे.तर चिंता आणखी वाढतील- येत्या २६ मे रोजी मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्या आधी १२ मे रोजी मोदी सरकारची कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्त्वपरीक्षा होत आहे.- मोदी यांची लोकप्रियताही कमी झाली आहे, असा दावा केला जात आहे. मात्र इतर नेत्यांच्या तुलनेत ते आजही अधिक लोकप्रिय आहेत, असे चाचण्यांतून आढळून आले आहे.- गुंतवणूकदारांत ते अद्याप लोकप्रिय आहेत. पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांत त्रिशंकू जनादेश मिळाल्यास गुंतवणूकदारांच्या चिंता वाढतील.
रोजगार निर्मितीचे आकडे द्या, मोदी यांचे मंत्र्यांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 12:45 AM