संजय खांडेकरअकोला: एकाच बँक खात्याचे दोन एटीएम कार्ड दोन ग्राहकांना वितरीत झाल्याने एका खातेदाराचे ३४,८०० रुपये एटीएममधून परस्पर दुसऱ्या ग्राहकाने काढल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार बँकेच्या तांत्रिक चुकीमुळे झाल्याने बँकेने तातडीने सदर ग्राहकाच्या खात्यात रक्कम पूर्ववत जमा केली. अकोल्यातील बँक आॅफ महाराष्ट्रच्या उमरी शाखेत ही घटना घडली.
संध्या मोहन देशमुख यांचे बचत खाते आहे. देशमुख यांच्या विनंतीवरून बँकेने २४ जून २०१९ रोजी त्यांना एटीएम कार्ड दिले. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी गरजेनुसार एटीएममधून गरजेनुसार रकमा काढल्या. बँक खात्यात पुरेशी रक्कम असल्यानंतरही एटीएममधून रक्कम निघत नसल्याचे १८ जुलैला त्यांच्या लक्षात आल्याने त्या संभ्रमात पडल्या. त्यांनी मोबाइलवरील मेसेज तपासून पाहिले असता १८ आणि १९ जुलैला त्यांच्या खात्यातून रक्कम काढली गेल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी बँकेत धाव घेतली. बँक अधिकाऱ्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे देशमुख यांनी थेट बँक आॅफ महाराष्ट्रच्या विभागीय कार्यालयातील व्यवस्थापकांची भेट घेतली. विभागीय व्यवस्थापकांनी शाखा व्यवस्थापकांची कानउघाडणी केली. बँकेने शोध घेतल्यानंतर देशमुख यांच्या बचत खात्यावर दोन एटीएम कार्यान्वित झाल्याचे समोर आले. देशमुख यांच्याऐवजी दुसºया व्यक्तीने खात्यातून ३४,८०० रुपये काढल्याचे समोर आले.