Join us

आधार कार्ड देताय? मग आधी करा लॉक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 10:30 AM

तुमची होणारी फसवणूक टाळायची असेल तर आधार कार्ड लॉक करणे शक्य आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांना आधारकार्ड सक्तीचे करण्यात आलेले आहे. व्यक्तीचे अधिकृत ओळखपत्र म्हणून आधारकार्ड अत्यंत महत्त्वाचे असते. अनेक बिगरसरकारी योजना, आर्थिक अनुदान योजना, सवलत योजना आदीसाठी आधारकार्ड गरजेचे असते. कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारासाठीही पॅन कार्डासोबत आधार कार्डही मागितले जात असते. परंतु सर्व ठिकाणी होत असलेल्या आधार कार्डाच्या वापरामुळे याचे गैरवापर होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याने वापरकर्त्यांना आता अधिक सतर्क व्हावे लागणार आहे. तुमची होणारी फसवणूक टाळायची असेल तर आधार कार्ड लॉक करणे शक्य आहे. कार्ड लॉक केल्यास त्यातील डेटा कुणालाही वापरता येणार नाही. त्यामुळे त्याचा होणारा गैरवापरही टाळता येईल.

लॉक करण्याचे काय फायदे?

आधारकार्डमध्ये बायोमेट्रीक माहिती (बोटांचे ठसे, डोळ्याचे स्कॅन तसेच फोटो) असते. ही माहिती गोपनीय असते. तुमच्याशिवाय कुणीही याचा वापर करू शकत नाही. कार्ड लॉक केले तर याचा होणारा गैरवापर  टाळता येतो. आधारकार्ड हरवले असेल तर सर्वात प्रथम ते लॉक करावे. यामुळे त्याचा गैरवापर केला जाऊ शकत नाही. लॉक करताना तुम्हाला एक विशिष्ट कोड दिला जातो. कुणाही कार्डचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला तत्काळ नोटिफिकेशन पाठविली जाते. त्यामुळे पुढचा धोका टाळणे शक्य होते.

कसे करावे लॉक-अनलॉक?

आधारकार्ड लॉक करण्यासाठी तुमच्या मोबाइल फोनवरून GETOTP लिहून नंतर स्पेस द्या आणि तुमच्या आधार क्रमांकातील शेवटचे चार किंवा आठ अंक लिहा आणि हा मेसेज १९४७ या क्रमांकावर पाठवा. यानंतर तुम्हाला ओटीपी पाठविण्यात येईल. त्यानंतर LOCK UID लिहून स्पेस द्या. त्यानंतर आधार क्रमांकातील शेवटचे चार किंवा आठ अंक लिहा आणि स्पेस देऊन आलेला ओटीपी टाईप करा. हा मेसेज १९४७ या क्रमांकावर पाठवा. यानंतर तुम्हाला कार्ड लॉक झाल्याचा संदेश येईल.

 

टॅग्स :आधार कार्ड