मुंबई : इन्फोसिसने तिमाही कामगिरीत चमक दाखविली असतानाही गुुरुवारी शेअर बाजार घसरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८१ अंकांनी घसरून २४,७७२.९७ अंकांवर बंद झाला. टाटा स्टीलच्या समभागांत मोठ्या प्रमाणात झालेली विक्री सेन्सेक्सला महागात पडली. डॉलरच्या तुलनेत रुपया ६७ वर गेला आहे. ४ सप्टेंबर २0१३ रोजी तो या पातळीवर होता. याचाही फटका बाजाराला बसला.आशिया आणि युरोपीय बाजारांतही नरमाईचाच कल होता. त्यांची री ओढत बीएसई सेन्सेक्स सकाळी तब्बल ३00 अंकांच्या घसरणीसह २४,४७३.२२ अंकांवर उघडला. त्यानंतर झालेल्या मोठ्या खरेदीमुळे तो २५ हजार अंकांच्या पुढे गेला होता. तथापि, ही वाढ त्याला कायम राखता आली नाही. सत्राच्या अखेरीस ८१.१४ अंकांची म्हणजेच 0.३३ टक्क्याची घसरण नोंदवून सेन्सेक्स २४,७७२.९७ अंकांवर बंद झाला. बुधवारी सेन्सेक्सने १७२.0८ अंकांची वाढ मिळविली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५.६0 अंकांनी अथवा 0.३४ टक्क्याने घसरून ७,५३६.८0 अंकांवर बंद झाला. टाटा स्टीलचे समभाग ३.३६ टक्क्यांनी घसरून २३८.७0 रुपयांवर बंद झाले. जागतिक रेटिंग संस्था एस अँड पीने कंपनीचे रेटिंग कमी केल्याचा फटका समभागांना बसला. याशिवाय अॅक्सिस बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांचे समभागही घसरले. बीएसई बँकिंग निर्देशांक १.६७ टक्के घसरला. - जागतिक पातळीवर आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहायला मिळाला. जपानचा निक्केई २.६८ टक्क्यांनी, तर हाँगकाँगचा हँग सेंग 0.५९ टक्क्याने घसरला. या उलट चीनचा शांघाय कंपोजिट १.९७ टक्क्याने वर चढला. युरोपीय बाजारात सकाळी घसरण दिसून आली.- सेन्सेक्समधील ३0 पैकी २१ कंपन्यांचे समभाग घसरले. व्यापक बाजारातही नरमाईचाच कल दिसून आला. स्मॉलकॅप १.२७ टक्क्याने, तर मिडकॅप १ टक्क्याने घसरला.
जागतिक घसरणीचा सेन्सेक्सला फटका
By admin | Published: January 15, 2016 2:53 AM