संजय खांडेकर
अकोला : अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या बलाढ्य ऑनलाइन कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी आता ग्लोबल किराणा लिंकर्सचे नवीन ई-कॉमर्स पोर्टल मैदानात आले आहे. कॉन्फेडरेशन ऑल इंडिया ट्रेडर्सच्या सहकार्याने सुरू झालेल्या या ऑनलाइन घरपोच सेवेचा शुभारंभ मुंबई, पुण्यात झाला असून, आता विदर्भात जाळे विणले जात आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे देशात लॉकडाउन झाले. या काळात लोकांना जीवनावश्यक सेवा पुरविण्यासाठी डिजिटल सेवा देणाऱ्या दोन बलाढ्य कंपन्या पुन्हा पुढे आल्या. वास्तविक स्थानिक किराणा रिटेलर चांगली सेवा देत असताना या कंपन्यांनी उडी घेतली. केंद्र शासनानेदेखील त्यांना मान्यता देऊ केली. मात्र यादरम्यान कॉन्फेडेरेशन आॅल इंडिया ट्रेडर्सच्या पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे ई-कॉमर्सची ही मान्यता तूर्त थांबली. दरम्यान ई-कॉमर्स पोर्टलच्या माध्यमातून आता ग्लोबल किराणा लिंकर्स पुढे आले आहेत. कॉन्फेडरेशन आॅल इंडिया ट्रेडर्सच्या पुढाकारात स्थानिक किराणा दुकानदारांची यादी ग्लोबल किराणा लिंकर्सला देण्यात आली आहे. ग्राहकाला त्याच्या निवासाच्या पाच किलोमीटर अंतरावरील दुकानांची यादी आणि त्यातील उपलब्ध साहित्य, आॅफर, डिस्काउंटची माहिती यामध्ये असेल. आॅनलाइन आॅर्डर केल्यानंतर त्याच दिवशी सर्व किराणा घरपोहोच केला जाईल. लॉकडाउन असेपर्यंत कंपनी कोणत्याही प्रकारचे डिलेव्हरी
चार्जेस लावणार नाही. मात्र लॉकडाउनच्या काळातच ग्लोबल किराणा लिंकर्सला स्थानिक किराणा दुकानदार आणि ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचायचे आहे.
>येथे सुरू झाले ई-स्टोअर्स
कानपूर, लखनौ, गाजियाबाद, बनारस, मुंबई, पुणे या ठिकाणी ग्लोबल किराणा लिंकर्सचे ई-स्टोअर्स सुरू झाले असून, पूर्व आणि पश्चिम विदर्भात आता जाळे विस्तारले जात आहे. काही दिवसांतच विदर्भात ही सेवा सुरू होणार आहे. त्यानंतर नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्राच्या उर्वरित भागात जाळे विस्तारले जाणार आहे. ग्राहक आणि कंपनीचा थेट संपर्क असल्याने ग्राहकाला त्याचा लाभ होणार असल्याचे ग्लोबल किराणा लिंकर्सचे अक्षय पानसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ऑनलाइन घरपोच सेवा देणार ग्लोबल किराणा लिंकर्स
कॉन्फेडरेशन ऑल इंडिया ट्रेडर्सच्या सहकार्याने सुरू झालेल्या या ऑनलाइन घरपोच सेवेचा शुभारंभ मुंबई, पुण्यात झाला असून, आता विदर्भात जाळे विणले जात आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 03:17 AM2020-04-28T03:17:48+5:302020-04-28T03:18:05+5:30