नवी दिल्ली : जागतिक पातळीवर यंदा ४८,००० मेगावॅट अतिरिक्त सौरऊर्जा उत्पादन क्षमता होईल, असा अंदाज आहे. काही देशांमध्ये धोरणात्मक पाठिंबा मिळाल्यामुळे गेल्या वर्षीच्या उत्पादन क्षमतेपेक्षा यात मोठी वाढ झाली आहे. स्वच्छ ऊर्जेशी संबंधित जागतिक कंपनी मेरकॉम कॅपिटन समूहाने हा अंदाज वर्तविला आहे. सौर ऊर्जा उत्पादन क्षमतेतील वाढीच्या दृष्टीने २०१४ च्या पहिल्या सहामाहीत तितकीशी चांगली नव्हती.कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, चीनने अलीकडेच धोरणात्मक उपाययोजना केल्याने चालू वर्षाच्या उर्वरित अवधीत एकूण क्षमता ४८ गिगावॅट अर्थात ४८,००० मेगावॅटने वाढेल. २०१३ मध्ये सौर ऊर्जा उत्पादन क्षमतेत ३८,००० मेगावॅटची वाढ झाली होती.निवेदनानुसार, भारतीय सौर ऊर्जा बाजार गेल्या काही वर्षांपासून जवळपास एक गिगावॅटवर अडकला आहे. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर धोरण निर्माते या क्षेत्रावर विशेष लक्ष देत आहेत. नवीन कार्यक्रम लागू करण्याची प्रक्रिया सुरू असून यामुळे क्षमतेत वाढ होणे अपेक्षित आहे. कंपनीच्या मते, भारतीय सौर बाजाराला २०१५ नंतर चालना मिळेल. चीन, जपान व अमेरिकेसह भारतीय बाजार आगेकूच करू शकतो.(लोकमत न्यूज नेटवर्क)
जागतिक सौरऊर्जा क्षमता ४८,००० मेगावॅटने वाढणार
By admin | Published: September 27, 2014 7:04 AM