Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारांची जागतिक तेजी, अर्थव्यवस्थेशी कोणताही संबंध नाही -  गव्हर्नर शक्तिकांत दास

शेअर बाजारांची जागतिक तेजी, अर्थव्यवस्थेशी कोणताही संबंध नाही -  गव्हर्नर शक्तिकांत दास

अतिरिक्त गंगाजळीचा परिणाम : बाजारात ‘करेक्शन’ येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 01:52 AM2020-08-23T01:52:11+5:302020-08-23T07:39:09+5:30

अतिरिक्त गंगाजळीचा परिणाम : बाजारात ‘करेक्शन’ येणार

Global stock market boom has nothing to do with economy - Governor Shaktikant Das | शेअर बाजारांची जागतिक तेजी, अर्थव्यवस्थेशी कोणताही संबंध नाही -  गव्हर्नर शक्तिकांत दास

शेअर बाजारांची जागतिक तेजी, अर्थव्यवस्थेशी कोणताही संबंध नाही -  गव्हर्नर शक्तिकांत दास

नवी दिल्ली : सध्या जगभरातील शेअर बाजारांत उसळलेल्या तेजीचा वास्तव अर्थव्यवस्थेशी कोणताही संबंध नाही, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. जगातील अतिरिक्त गंगाजळी वित्तीय बाजारात ओतली जात आहे, त्यामुळे बाजार तेजीत आले असून येणाऱ्या काळात बाजारांत निश्चितपणे ‘करेक्शन’ येईल, असेही दास यांनी सांगितले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दास यांनी हे वक्तव्य केले. भारतीय अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यास रिझर्व्ह बँक तयार आहे, अशी ग्वाही देऊन दास यांनी म्हटले की, जगभरातील केंद्रीय बँकांकडून अतिरिक्त निधी शेअर बाजारात ओतला जात आहे. त्यामुळे बाजारांतील तेजी आणि वास्तव अर्थव्यवस्था यांचा असंबंध (डिसकनेक्ट) निर्माण झाला आहे. हा जागतिक प्रवाह असून भारतासाठी आश्चर्यकारक नाही. या असंबंधाचा उल्लेख आम्ही ‘एमपीसी रिझोल्यूशन’मध्ये केला होता. मागे एका भाषणातही मी बोललो होतो.

दास यांनी म्हटले की, आताची अभूतपूर्व वाढ पाहता आगामी काळात बाजारात ‘करेक्शन’ अवश्य होईल; पण ते केव्हा होईल, हे सांगता येणार नाही. तथापि, वित्तीय क्षेत्राच्या दृष्टीने आम्ही त्यावर नियमितपणे नजर ठेवून आहोत. त्याचा प्रतिकूल परिणाम रोखण्यासाठी आम्ही नक्कीच पावले उचलू. कोविड-१९ महामारीचा परिणाम रोखण्यासाठी जगातील विविध केंद्रीय बँकांनी वित्तीय बाजारात ६ लाख कोटी डॉलरपेक्षाही जास्त निधी ओतला आहे. व्याजदर कमी करून जवळपास शून्यावर आणले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकही गंगाजळी ओतणे आणि मौद्रिक उपाययोजना याबाबत सक्रिय आहे. आम्ही मार्चपासून जवळपास १० लाख कोटी रुपये वित्तीय बाजारात ओतले आहेत.

दास यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनेही बाजार व अर्थव्यवस्थेतील असंबंधावर चर्चा केली आहे. अर्थव्यवस्थेची मूलतत्त्वे आणि बाजार यांच्यात असंबंधांची स्थिती अत्यंत दुर्मिळ बाब आहे. त्यामुळे अशा असंबंधातून विध्वंसक बाजार करेक्शन येण्याची जोखीम कायम राहणार आहे. उगवत्या अर्थ- व्यवस्थांसाठी तर सर्वाधिक जोखीम आहे.

Web Title: Global stock market boom has nothing to do with economy - Governor Shaktikant Das

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.