योगेश बिडवई, मुख्य उपसंपादक
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अन्नधान्याची टंचाई पाचवीला पूजलेला देश अशी भारताची ओळख होती. मात्र, ती ओळख पूर्णपणे पुसून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण अशी ओळख जगात निर्माण करण्यात भारत यशस्वी ठरला. मात्र, बदलत्या हवामानामुळे जगभर शेतीवर मोठे संकट येऊ पाहत आहे. अवेळी पावसाने अनेकदा पिकांचे मोठे नुकसान होते. वाढते तापमान हासुद्धा गहू, तांदळापासून अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम करणारा घटक आहे. त्यातून २०३५ पर्यंत ०.३२ ते १.१८ टक्क्यांपर्यंत महागाई वाढू शकते, असा भीती युरोपियन सेंट्रल बँकेने व्यक्त केली आहे.
५०० वर्षांतील मोठा दुष्काळ
- युरोप खंडात २०२२ मध्ये ५०० वर्षांतील सर्वांत भयंकर दुष्काळ पडला. त्यातून अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम झाला.
- आफ्रिका खंडातही दुष्काळी स्थिती होती. अमेरिका तसेच मॅक्सिकोमधील अनेक भागांमध्ये पाण्याचे मोठे संकट उभे राहिले. त्यातून शेती उत्पादनावर परिणाम झाला.
- अर्जेंटिनालाही वाढत्या तापमानाचा फटका बसून मक्याचे उत्पादन कमी झाले.
- तापमान वाढीमुळे २०३५ पर्यंत महागाई दर ०.३२ ते १.१८ टक्के वाढण्याची शक्यता आहे.
- अन्नधान्याची महागाई ०.९२ टक्के ते ३.२३ टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
युरोपातील २२ टक्के भूभागावर जलसंकट
- स्पेनला सर्वाधिक फटका बसला आहे. - फळांचे उत्पादन घटले आहे. - दशकातील सर्वात कमी पीक येईल, अशी युरोपातील शेतकऱ्यांना भीती आहे. - तृणधान्ये, तेलबियांचे उत्पादन तर काही ठिकाणी ८० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. - बदलत्या हवामानामुळे दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. युरोपात अनेक शहरांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.