मुंबई : २0१९ च्या एप्रिल-जून तिमाहीत सोन्याची जागतिक मागणी वार्षिक आधारावर ८ टक्क्यांनी वाढून १,१२३ टन झाली आहे. केंद्रीय बँकांनी केलेली जोरदार सोने खरेदी आणि सोने-समर्थित ईटीएफमधील गुंतवणूक यामुळे सोन्याची मागणी वाढल्याचे एका अहवालात म्हटले आहे. २0१८ च्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याची एकूण मागणी १,0३८.८ टन होती, असे जागतिक सोने परिषदेने जारी केलेल्या दुसºया तिमाहीतील सोने कल अहवालात म्हटले आहे.
अहवालानुसार, एप्रिल-जून २0१९ मध्ये केंद्रीय बँकांची सोने मागणी ६७ टक्क्यांनी वाढून २२४.४ टनांवर गेली आहे. आदल्या वर्षी या कालावधीत ती १५२.८ टन होती. पोलंड हा सर्वांत मोठा सोने खरेदीदार देश म्हणून पुढे आला आहे. या देशाने आपल्या सोन्याच्या साठ्यात १00 टन सोने वाढविले आहे. मोठा सोने खरेदीदार म्हणून लौकिक असलेला रशिया दुसºया स्थानी राहिला. वार्षिक आधारावर एकूण गुंतवणूक मागणी एक टक्क्याने वाढली आहे. युरोपातील एक्स्चेंज-ट्रेडेड फंडांनी (ईटीएफ) बार आणि नाणी यातील मागणी १२ टक्क्यांनी कमी केली आहे. एप्रिल-जूनमध्ये सोने-समर्थित ईटीएफ ६७.२ टनांनी वाढून २,५४८ टनांवर गेली. हा सहा वर्षांचा उच्चांक आहे.
जागतिक सोने परिषदेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पीआर यांनी सांगितले की, सातत्याने सुरू असलेली भूराजकीय अस्थिरता, केंद्रीय बँकांची धोरणे आणि जूनमध्ये सोन्याच्या किमतीतील तेजी यामुळे सोने मागणी वाढली आहे. जागतिक सोने परिषदेच्या बाजार गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख अॅलिस्टर हेविट यांनी सांगितले की, जून महिना सोन्यासाठी महत्त्वपूर्ण राहिला. या महिन्यात सोन्याच्या किमती साडेसहा वर्षांच्या उच्चांकावर गेल्या. व्यवस्थापनाधीन सोने समर्थित ईटीएफ मालमत्ता १५ टक्क्यांनी वाढल्या. २0१२ नंतरची ही सर्वांत मोठी मासिक वृद्धी ठरली.
भारताच्या आभूषण बाजारात सुधारणा
च्अहवालात म्हटले आहे की, भारताच्या आभूषण बाजारात सुधारणा झाल्यामुळे जागतिक सोने मागणी २ टक्क्यांनी वाढून ५३१.७ टनांवर गेली.
च्आदल्या वर्षी याच कालावधीत ती ५२०.८ टन होती. लग्नसराईचा हंगाम आणि सणासुदीची खरेदी चांगली राहिल्यामुळे भारतीय बाजारात चैतन्य संचारले आहे.