Join us

Go Firstच्या संकटात SpiceJetने शोधली संधी! २५ विमाने पुन्हा उड्डाण घेणार; बंद सेवा सुरु करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 2:08 PM

SpiceJet: स्पाइसजेटकडून २५ विमानांची सेवा पुन्हा सुरू केली जाणार असून, यासाठी ४०० कोटींचा निधी उभारण्यात आला आहे.

SpiceJet: परवडणाऱ्या दरात विमान सेवा देणाऱ्या गो फर्स्ट कंपनीचे चाक आर्थिक गर्तेत रूतले असून, कंपनीने राष्ट्रीय कंपनी विधि प्राधिकरणाकडे (एनसीएलटी) दिवाळखोरीचा अर्ज दाखल केल्याचे वृत्त आहे. विमानांमधील तांत्रिक अडचणींमुळे कंपनीच्या ताफ्यातील ६१ पैकी ३० विमाने इंजिनमध्ये त्रुटी असल्याने जमिनीवर आहेत.आर्थिक स्थिती नाजूक असल्याने आगामी दोन दिवसांसाठीही विमान उड्डाणे कंपनीने स्थगित केली आहेत. मात्र, Go First संकटात असताना SpiceJet ने एक चांगली संधी शोधली असून, स्पाइसजेटची २५ विमाने पुन्हा उड्डाण घेणार आहेत. काही मार्गांवर बंद केलेली सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

तांत्रिक कारणांसोबतच कंपनीची आर्थिक अवस्थादेखील दोलायमान असल्याचे समजते. विमानाचा इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडे पैशांची देणी बाकी असल्यामुळे कंपनीने आगामी दोन दिवसांसाठी विमान सेवा स्थगित केली आहे. वाडिया उद्योग समूहाच्या मालकीची विमान कंपनी असलेल्या गो फर्स्ट कंपनीची आर्थिक अवस्था नाजूक झाली आहे. मात्र, यातून आता SpiceJet ने एक महत्त्वाकांक्षी धोरण राबवण्याचे ठरवले असून, गुंतवणूकदारांनीही याला प्रतिसाद दिल्याचे सांगितले जात आहे. 

SpiceJet ने योजनेसाठी गोळा केला ४०० कोटींचा निधी

गो फर्स्ट एअरलाईन्स दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना स्पाईसजेटने मोठा निर्णय घेतला आहे. स्पाईसजेट आपल्या बंद असलेल्या २५ विमानांची सेवा पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात असून या योजनेसाठी स्पाईसजेटने ४०० कोटी रुपयांचा निधीही गोळा गेल्याची माहिती आहे. आम्ही आमच्या बंद असलेल्या २५ विमानांची सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी आम्ही सरकारच्या इमर्जन्सी क्रेडीट लाईन हमी योजनेतून ४०० कोटी रुपयांचा निधी गोळा केला आहे. या योजनेमुळे आगामी काळात कंपनीच्या महसुलातही वाढ होण्याची शक्यता आहे, असे स्पाइसजेटचे व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, स्पाइसजेट कंपनीच्या या निर्णयाचे गुंतवणूकदारांनी समर्थन केल्याचे पाहायला मिळत आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर स्पाइसजेटचे शेअर ५ टक्क्यांनी वाढले. आताच्या घडीला स्पाइसजेटचा शेअर ३२ रुपयांवर व्यवहार करत आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :स्पाइस जेटविमान