Join us  

‘गो फर्स्ट’ कंपनी होणार ‘ऑफ एअर’?; दिवाळखोरीचा अर्ज दाखल, अर्धी विमाने जमिनीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 6:25 AM

सर्वप्रथम २०१९ मध्ये कंपनीच्या विमानांमध्ये तांत्रिक दोष आढळल्याने सात टक्के विमानांचे उड्डाण थांबविण्यात आले.

मुंबई - परवडणाऱ्या दरात विमान सेवा देणाऱ्या गो फर्स्ट कंपनीचे चाक आर्थिक गर्तेत रूतले असून, कंपनीने राष्ट्रीय कंपनी विधि प्राधिकरणाकडे (एनसीएलटी) दिवाळखोरीचा अर्ज दाखल केल्याचे वृत्त आहे. एकीकडे विमानांमधील तांत्रिक अडचणींमुळे कंपनीच्या ताफ्यातील ६१ पैकी ३० विमाने इंजिनमध्ये त्रुटी असल्याने जमिनीवर आहेत. त्यांच्या उड्डाणाचे कोणतेही नियोजन कंपनीने केलेले नाही. दुसरीकडे आर्थिक स्थिती नाजूक असल्याने आगामी दोन दिवसांसाठीही विमान उड्डाणे कंपनीने स्थगित केली आहेत. 

ही दुर्दैवी बाब : ज्योतिरादित्य शिंदेइंजिनाच्या मुद्यावरून गो फर्स्ट कंपनीला सध्या अत्यंत बिकट प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. या विमान कंपनीला केंद्र सरकारतर्फे सर्वतोपरी सहाय्य केले जाईल. आता न्यायालयीन प्रक्रियेची वाट पाहणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी एक निवेदन जारी करून दिली आहे.

घटनाक्रमसर्वप्रथम २०१९ मध्ये कंपनीच्या विमानांमध्ये तांत्रिक दोष आढळल्याने सात टक्के विमानांचे उड्डाण थांबविण्यात आले. 

आर्थिक परिस्थिती बिकटतांत्रिक कारणांसोबतच कंपनीची आर्थिक अवस्थादेखील दोलायमान असल्याचे समजते. विमानाचा इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडे पैशांची देणी बाकी असल्यामुळे कंपनीने आगामी दोन दिवसांसाठी विमान सेवा स्थगित केली आहे. वाडिया उद्योग समूहाच्या मालकीची विमान कंपनी असलेल्या गो फर्स्ट कंपनीची आर्थिक अवस्था नाजूक झाली आहे. यासंदर्भात सरकारला तसेच नागरी विमान महासंचालनालयालाही कंपनीने माहिती दिली आहे.

डीजीसीएची कंपनीला नोटीसकंपनीने विमाने स्थगित केल्याच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने कंपनीला नोटीस जारी केली आहे. स्थगित विमानांतून प्रवास करणाऱ्यांची पर्यायी व्यवस्था करावी व त्यांना किमान त्रास व्हावा, असे डीजीसीएने नमूद केले आहे.

टॅग्स :विमान