Join us

Go First च्या प्रवाशांची वाढली चिंता! एअरलाइन्सने 28 मे पर्यंत रद्द केली उड्डाणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 10:54 PM

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गो फर्स्ट एअरलाइन्सची उड्डाणे 3 मे पासून बंद आहेत.

नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडल्यामुळे गो फर्स्ट (Go First) एअरलाइन्सने 28 मे 2023 पर्यंत उड्डाणे रद्द (Flight Cancel) केली आहेत. यापूर्वी ऑपरेशनल संबंधी कारणांचा हवाला देत 26 मे पर्यंत उड्डाणे स्थगित करण्याची घोषणा केली होती. तसेच, लवकरच बुकिंग पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी शक्यता एअरलाइन्सने वर्तविली होती.

दरम्यान, आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गो फर्स्ट एअरलाइन्सची उड्डाणे 3 मे पासून बंद आहेत. एअरलाइन्सने दिवाळखोर याचिकेत म्हटले होते की, कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. दिवाळखोरीच्या याचिकेनंतर एअरलाइन्स कंपनीला उड्डाणे चालविण्यात अयशस्वी झाल्यानंतर परवाना का रद्द केला जाऊ नये, असे विचारत डीजीसीएने एक कारणे दाखवा नोटीस दिली होती. तसेच, पुढील आदेशापर्यंत त्वरित परिणामासह विमान तिकिटांची विक्री थांबविण्यास कंपनीला सांगितले होते.

डीजीसीएने 30 दिवसांच्या आत गो फर्स्ट एअरलाइन्सला आपले रिव्हाइवल प्लॅन सादर करण्यास सांगितले आहे. तसेच, डीजीसीएने एअरलाइन्सला विमान, पायलट आणि इतर कर्मचारी, देखभाल आणि इतर गोष्टींसह इतर गोष्टींबद्दल माहिती देण्यास सांगितले आहे. 8 मे रोजी एअरलाइन्सने आपल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर दिल्यानंतर डीजीसीएने हा आदेश जारी केला आहे. 

दरम्यान, गो फर्स्ट एअरलाइन्स वाडिया ग्रुपची बजेट एअरलाइन्स आहे. गो फर्स्ट एअरलाइन्सने नोव्हेंबर 2005 मध्ये मुंबईहून अहमदाबादसाठी पहिल्यांदा उड्डाण केले होते. गो फर्स्टच्या ताफ्यात 59 विमानांचा समावेश आहे. कंपनी 27 डोमेस्टिक आणि 8 इंटरनॅशनल डेस्टिनेशनसाठी आपले विमानांचे उड्डाण करते.

टॅग्स :विमानव्यवसाय