Join us

Go First : गो-फर्स्टने 9 मे पर्यंत उड्डाणे केली रद्द, DGCA कडून रिफंड प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 2:11 PM

अद्याप आर्थिक संकटातून बाहेर पडण्याच्या मार्ग सापडला नाही. त्यामुळे गो-फर्स्ट एअरलाइन्सच्या अडचणी वाढल्या आहेत.

नवी दिल्ली : खाजगी क्षेत्रातील गो-फर्स्ट एअरलाइन्सवरील संकट काही संपताना दिसत नाही. इंजिन सप्लायर कंपनी प्रॅट अँड व्हिटनीकडून इंजिनची डिलिव्हरी न केल्यामुळे गो-फर्स्ट एअरलाइन्सला 9 मे पर्यंत आपली उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. यापूर्वी कंपनीने केवळ तीन दिवस उड्डाणे बंद केली होती. मात्र, अद्याप कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर पडण्याच्या मार्ग सापडला नाही. त्यामुळे गो-फर्स्ट एअरलाइन्सच्या अडचणी वाढल्या आहेत.

याचबरोबर, गो-फर्स्ट एअरलाइन्सने 15 मे पर्यंत तिकिट विक्री थांबवली आहे आणि सध्याच्या बुकिंगच्या तारखा आणखी बदलण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे. डीजीसीएने यापूर्वी 3 मे ते 5 मे पर्यंतची उड्डाणे रद्द करण्यासाठी गो-फर्स्ट एअरलाइन्सला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला उत्तर मिळाल्यानंतर डीजीसीएने सांगितले की, गो-फर्स्ट एअरलाइन्सकडून अचानकपणे ऑपरेशन्स स्थगित केल्यामुळे प्रवाशांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी कंपनी वचनबद्ध आहे.

गो-फर्स्ट एअरलाइन्स कंपनीने दिवाळखोरीच्या कारवाईअंतर्गत सरकारला संकटातून बाहेर काढण्याची मागणी देखील केली आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांनी तिकिटांचे पैसे परत करावेत, असा प्रश्न उपस्थित केला आहे. आता विमान वाहतूक नियामक डीजीसीएने याबाबत आदेश जारी केला आहे. डीजीसीएने म्हटले आहे की, गो-फर्स्ट एअरलाइन्सने प्रवाशांना पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू करावी.

दरम्यान, वाढत्या तोट्यामुळे कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. गो फर्स्टने पेट्रोलियम कंपन्यांची थकबाकी न दिल्यामुळे 3 आणि 4 मे रोजी उड्डाणे रद्द केल्याचे वृत्त मंगळवारी सकाळी समोर आले होते. याशिवाय कंपनीत रोख रकमेचीही तीव्र टंचाई उद्भवली आहे. याशिवाय, प्रॅट अँड व्हिटनी इंजिनच्या वारंवार समस्या आणि पुरवठ्यामुळे कंपनीला अर्ध्याहून अधिक विमानं ग्राउंडेड करावी लागली. ही इंजिन Airbus A320 Neo विमानांना पॉवर सप्लाय करतात.

टॅग्स :विमानव्यवसाय