Join us  

दोन महिन्यांची गो-फर्स्टला मुदतवाढ, राष्ट्रीय कंपनी विधि प्राधिकरणाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 9:13 AM

Mumbai News: कंपनीच्या ताफ्यातील निम्म्या विमानांच्या इंजिनमध्ये निर्माण झालेला तांत्रिक दोष आणि कंपनीची  आर्थिक स्थिती दोलायमान झाल्यामुळे गेल्या वर्षापासून बंद पडलेल्या गो-फर्स्ट कंपनीला दिवाळखोरीची प्रक्रिया राबविण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

 मुंबई - कंपनीच्या ताफ्यातील निम्म्या विमानांच्या इंजिनमध्ये निर्माण झालेला तांत्रिक दोष आणि कंपनीची  आर्थिक स्थिती दोलायमान झाल्यामुळे गेल्या वर्षापासून बंद पडलेल्या गो-फर्स्ट कंपनीला दिवाळखोरीची प्रक्रिया राबविण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. हा निर्णय राष्ट्रीय कंपनी विधि प्राधिकरणाने (एनसीएलटी) घेतला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात कंपनीचे कामकाज बंद पडल्यानंतर १० मे २०२३ रोजी कंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर कंपनीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. कंपनीला पुनर्रुज्जीवित करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर दिवाळखोरीच्या प्रक्रियेनुसार कंपनीच्या विक्रीसाठी लिलाव करण्याचादेखील प्रयत्न झाला. मात्र, वर्षभरात त्याला यश आले नाही. दरम्यानच्या काळात ज्या कंपन्यांनी गो-फर्स्टला भाडेतत्त्वावर विमाने दिली होती त्यांनी विमानांची नोंदणी रद्द करत त्याचा ताबा मिळवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायालयाने या विमानांची नोंदणी रद्द केली होती. ज्या कंपन्यांनी गो-फर्स्टला कर्ज दिले होते, त्या कर्जाच्या वसुलीसाठी गो-फर्स्टने कर्जासाठी तारण ठेवलेल्या ठाणे येथील भूखंडाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. 

दुसऱ्यांदा संधी८ एप्रिल २०२४ रोजी देखील कंपनीला दिवाळखोरी प्रक्रिया राबविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. या वर्षात दुसऱ्यांदा ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

टॅग्स :विमानमुंबई