लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मे महिन्यापासून जमिनीवर स्थिरावलेल्या गो-फर्स्ट कंपनीच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसत असून, आता सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाने कंपनीचे कर्ज खाते थकीत कर्ज खाते (एनपीए) म्हणून घोषित केले आहे. कंपनी सध्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नशील आहे. अशा स्थितीत कंपनीचे कर्ज खाते थकीत खाते म्हणून घोषित झाल्यानंतर उड्डाणासाठी पुन्हा प्रयत्नशील असलेल्या कंपनीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, केंद्र सरकारचे काही विभाग, बँक ऑफ बडोदा अशा काही वित्तीय संस्थांनी मिळून सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज कंपनीला दिले आहे. आर्थिक गर्तेत गेल्यामुळे, तसेच कंपनीच्या निम्म्या विमानांच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे २ मे पासून कंपनीच्या विमानांनी उड्डाण केलेले नाही. १० मे रोजी कंपनीने दिवाळखोरीसाठीदेखील अर्ज केला होता. यानंतर कंपनीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानंतर कंपनीने पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू केले असून, कंपनीच्या खरेदीसाठी अभिव्यक्ती स्वारस्यदेखील मागवले आहे. तीन प्रमुख कंपन्यांनी कंपनीच्या खरेदीमध्ये रस दाखवला आहे. केवळ कंपनीचे तत्कालीन खर्च नव्हे, तर कर्जासह कंपनीची खरेदी ग्राहकाला करावी लागणार आहे.