Join us  

गो-फर्स्टचे ‘लँडिंग’ अन्य विमान कंपन्यांच्या पथ्यावर, बाजारातील हिस्सेदारी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 10:40 AM

१ कोटी ३२ लाख जणांचा मे महिन्यात विमान प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या २ मेपासून गो-फर्स्ट कंपनीची विमाने परिचालनातील समस्येमुळे जमिनीवर स्थिरावली होती. त्यांच्या विमानांच्या लँडिंगचा फायदा मात्र देशातील अन्य विमान कंपन्यांना झाला. यामुळे इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा, अकासा, स्पाईस जेट अशा सर्वच विमान कंपन्यांच्या बाजारातील हिस्सेदारीमध्ये वाढ झाली आहे. याचा सर्वाधिक लाभ हा इंडिगो कंपनीला झाल्याचे दिसून येते. कंपनीच्या हिस्सेदारीमध्ये साडे चार टक्क्यांच्या आसपास वाढ होत कंपनीची भारतीय हवाई क्षेत्रातील कंपनीची हिस्सेदारी आता ६१ टक्के झाली आहे.

नागरी विमान महासंचालनालय (डीजीसीए) ने मे महिन्यात झालेल्या घडामोडींची आकडेवारी प्रसिद्ध केली असून, यानुसार इंडिगोनंतर एअर इंडियाच्या प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे दिसते. कंपनीच्या हिस्सेदारीत १.४ टक्क्यांनी वाढ होत ती २६ टक्क्यांवर पोहोचली आहे. अकासा आणि स्पाईस जेट कंपन्यांच्या हिस्सेदारीतही अनुक्रमे ४.८ व ५.८ अशी वाढ झाली आहे, तर  ६.४ हिस्सेदारी असलेल्या गो-फर्स्टचे व्यवहार शुन्यावर थंडावले आहेत.

मे महिन्यामध्ये देशात एकूण १ कोटी ३२ लाख प्रवाशांनी प्रवास केला. यापैकी ८१ लाख १० हजार प्रवासी इंडिगो कंपनीने हाताळले, तर टाटा एअरलाइन्सच्या तीनही कंपन्यांनी मिळून एकूण ३४ लाख ८० हजार प्रवाशांना हाताळले. ७ लाख २० प्रवाशांनी स्पाइस जेट कंपनीने प्रवास करणे पसंत केले, तर अकासा एअरच्या माध्यमातून ६ लाख २९ हजार प्रवाशांनी प्रवास केला. गो-फर्स्टची ५२ विमाने दिवसाकाठी २०० फेऱ्या करत होती. ही विमानसेवा बंद झाल्यामुळे त्यांच्या प्रवाशांनी अन्य विमान कंपन्यांनी प्रवास केला. त्यातच मे महिन्यामध्ये सुटीचा कालावधी असल्यामुळे अनेकांनी विमान प्रवासाला प्राधान्य दिले. यामुळे जवळपास सर्वच विमान कंपन्यांची विमाने आता सरासरी ९० टक्क्यांनी भरली आहेत. अर्थात ही गोष्ट विमान कंपन्यांसाठी नफ्याची असली तरी विमानांतील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर ज्यांनी ऐनवेळी तिकीटे खरेदी केली त्यांना किमान अडीच पट दराने ती विकत घ्यावी लागली आहेत.

१ कोटी ३२ लाख जणांचा  मे महिन्यात विमान प्रवास

सरत्या मे महिन्यात देशात एकूण १ कोटी ३२ लाख लोकांनी विमानाने प्रवास केला असून, गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत हा आकडा १५.२ टक्क्यांनी जास्त आहे. कोरोना काळात विमान सेवा थंडावल्या होत्या. आता मात्र पुन्हा एकदा कोरोनापूर्व काळाप्रमाणेच लोक विमान प्रवास करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :विमानशेअर बाजार