Join us  

गो-फर्स्टची तारण जमीन विकून होणार, केवळ ५० टक्क्यांचीच वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 5:37 AM

ठाणे येथील जमिनीचा २२ जुलैला लिलाव ; १९६५ कोटी रुपये मिळणार

मुंबई : गेल्या २ मेपासून जमिनीवरच स्थिरावलेल्या गो-फर्स्ट कंपनीच्या मालकीच्या ठाणे येथील भूखंडाचा लीलाव येत्या दि. २२ जुलै रोजी होणार असून, याद्वारे १९६५ कोटी रुपयांची वसुली होणार असल्याचा अंदाज कर्जदार कंपन्यांना आहे. गो-फर्स्ट कंपनीला कर्जदारांनी एकूण ३९१८ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज दिले होते. मात्र, लीलावाद्वारे केवळ ५० टक्क्यांचीच वसुली होण्याची शक्यता आहे. 

कर्जापोटी गो-फर्स्ट कंपनीने ठाणे येथील ९४.७ एकर आकारमानाचा भूखंड तारण म्हणून ठेवला होता. मात्र, कर्जाची वसुली होत नसल्यामुळे या भूखंडाचा लिलाव करून वसुली करण्यात येणार आहे. लिलावाद्वारे मिळणारे पैसे हे प्रामुख्याने कर्जदार बँका, वित्तीय संस्था, आगाऊ तिकीट बुकिंग केलेले ग्राहक तसेच कंपनीचे ट्रॅव्हल एजंट यांना मिळू शकतील, असे समजते.

प्राप्त माहितीनुसार, मे महिन्यापासून पूर्णपणे थंडावलेल्या गो-फर्स्ट कंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दिवाळखोरीच्या नियमानुसार लिलावाद्वारे कंपनी विकण्याचीदेखील तयारी सुरू करण्यात आली होती. कंपनीच्या खरेदीसाठी स्वारस्य अभिव्यक्तीची जाहिरातदेखील प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु याप्रक्रियेला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. 

कंपनीच्या डोक्यावर कर्जाचा बोजा कंपनीच्या डोक्यावर कर्जाचा मोठा बोजा आहे. यामध्ये प्रामुख्याने बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, डोईश बँक, आयडीबीआय बँक यांनी कर्जरूपाने दिलेले पैसे अडकले आहेत. त्या खेरीज कंपनीच्या तिकिटांचे आगाऊ बुकिंग केलेल्या ग्राहकांचे पैसेदेखील अद्याप त्यांना परत मिळालेले नाहीत, तर कंपनीच्या ट्रॅव्हल एजंटचे पैसेदेखील त्यांना परत मिळालेले नाहीत. त्यामुळे कंपनीच्या मालमत्तांच्या लिलावाची चर्चा कर्जदारांमध्ये सुरू आहे. दिवाळखोरीच्या प्रक्रियेनुसार २७० दिवसांची मुदत आहे. त्यानंतर मालमत्तेचा लिलाव करण्याची तरतूद आहे. याच्याच आधारे ही प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :विमानव्यवसाय